बोलूया जरा पुस्तकांविषयी.

कोसलन (कादंबरी)
- शंकर पाटील

कॉलेजला सुट्टी लागल्याने मोकळा वेळ वाचनासाठी देता यावा यासाठी कॉलेज लायब्रेरी गाठली आणि शंकर पाटील यांची 'कोसलन' नावाची मराठी कादंबरी वाचण्यासाठी घेतली. शंकर पाटील हे माझ्या कॉलेजमध्ये काही वर्षे मराठी विषयाचे प्राध्यापक म्हणून रुजू होते. त्यांच्याबद्दल ऐकून होतो; पण त्यांचं साहित्य कधी वाचले नव्हते. त्यादिवशी 'कोसलन' पुस्तक हाती लागल्याने शंकर पाटील यांच्या लेखनातून ग्रामीण संस्कृतीचा परिचय झाला. व ग्रामीण संस्कृतीवर लिखाण करण्याची त्यांची कसदार लेखनशैली दिसून आली.

'कोसलन' कादंबरी ही मुळात ग्रामीण भाषेत म्हणजे कोकणातील आगरी भाषेतून व्यक्त होणारी असल्याने वाचायला वेगळाच अनुभव येतो.

'कोसलन' कादंबरीच्या सुरवातीपासून ते शेवटपर्यंत एकाच गावचे कथानक दिसते ते म्हणजे आडगाव. विज्ञानयुगात जग वावरत असले तरी विज्ञानाचा प्रकाश अजूनही सर्वत्र पसरलेला नाही, याचा प्रत्यय अडगावच्या संदर्भाने दिसून येतो. अडगावातील ग्रामस्थांवर जुनाट परंपरांचा पगडा दृढ असल्याने त्यांची दैवी शक्तींवर अतोनात असलेली श्रध्दा (अंधश्रध्दा) , भुत-भानामती यांवर विश्वास यामुळे गावात उद्भवलेल्या संकटांवर उपाय म्हणून यांकडे बघण्याचा अडगावातील ग्रामस्थांचा कल दिसतो.

गावात पाऊस पडला नाही, अनेक आजारांची साथ पसरली तर याला कारणीभूत कोण असेल तर ते म्हणजे दैवीशक्ती किंवा अघोरी शक्ती. या मतावर ग्रामस्थांचा असणारा विश्वास व त्या विश्वासातून भगत (अघोरी शक्ति) यसकरीन (दैवी शक्ती) यांचा हातून केले जाणारे पशुबळी, देवस्कीचे अनेक प्रकार संपूर्ण कादंबरीत पाहायला मिळतात. अडगावातील ही सगळी परीस्थिती समकालीन वैज्ञानिक विचार, औद्यौगिकीकरण हे आधुनिक जगतातील जीवनशैलीचा अभाव असल्याचे सांगते. विज्ञान म्हणजे काय? आधुनिकीकरण म्हणजे काय? हे अडगावातील लोकांना माहीत नसणे या परिस्थितीला कारणीभुत असणारा घटक म्हणजे शिक्षण (निरक्षरता) . अडगावातील एकूणेक जण अशिक्षित आहे. याला अपवाद असेल तर फक्त 'गजू' ; अडगावची भौगोलिक स्थितीमुळे इतर अत्याधुनिक (वाहतूक) सुविधांबरोबर शिक्षणाची सोय गावात नसल्याने दुसऱ्या गावात नदी ओलांडून प्रवास करत शालेय शिक्षण घेण्यात गजू यशस्वी होतो. नंतर पुढील महाविद्यालयीन शिक्षण घेण्यासाठी गाव सोडून शहरात जावं लागणार होते पण यासाठी घरातून व ग्रामस्थांकडून विरोध असल्याने गजू पुढील शिक्षण घेऊ शकत नाही. खरंतर विरोधापेक्षा ग्रामस्थांच्या शिक्षणासंदर्भात असलेल्या गैरसमजामुळे (जास्त शिकुन लोक वेडे होतात.) गजूचे शिक्षण होत नाही. ग्रामस्थांचा हा दृष्टिकोन, अश्या प्रकारची विचारसरणी परंपरेेनुसार चालत आली आहे. म्हणून गावच्या विकास खूंटल्याने याचे दुष्परीणाम होत असल्याची जाणीव गजूला होते.

ग्रामस्थांच्या असल्या विचित्र वागण्याची जाण त्यांना करून देण्यासाठीचा गजूचा संघर्ष कादंबरीत दिसून येते आणि सफल होतो. कारण गजूला यासाठी साथ मिळते ती म्हणजे गावातील त्याच्या तरुण मित्रांची. गजुने मिळवलेल्या ज्ञानातून म्हणजेच अनेक समाजसुधारकांच्या विचारांना प्रेरित होऊन गावातील तरुण मित्रांची दिशा योग्य मार्गाला आणून गावात क्रांती करण्याचं म्हणजे गावात लोकांच्या मनात असलेली अंधश्रध्दा दूर करणे, दारूबंदी, दारिद्र्य दूर करणे, एकंदरित गावाचा विकास करणे या ध्येयाशी खुणगाठ करतो.

कादंबरीचा शेवट मात्र विलक्षण होतो. गावातील तरुण आणि वडीलधारी माणसं यांच्यात विचारसंघर्ष सुरु झाल्याने एक दूरगामी आणि एक समकालीन अश्या दोन विचारांची टोकं तयार होतात. तसेच गावात साजरे होणारे उत्सव किंवा तत्सम कार्यक्रमात तरुणांनी केलेला विरोध. कारण उत्सवाच्या नावावर संस्कृतीचा हैदोस गावातल्या समविचारी तरुणांना मान्य नाही. असा दुजाभाव तयार झाल्याने गावात अस्थैर्याची परिस्थिती निर्माण होते. परंतु गजूला वाटते की गावात जो काही सलोखा होता तो सातत्य टिकवून राहावा आणि आपण आता तग धरू  नये. म्हणून गजू आणि त्याचे सहकारी गावातील संबध सूत्रे हातात घेतात. काही दिवसांत येऊन ठेपलेली होळीची तयारीत मग्न होतात. गजूच्या अश्या वागण्याने गावात पुन्हा चैतन्य निर्माण होतं. पाटील समस्त पुढारी ग्रामस्थ गावात होळी धूमधड्याक्यात साजरी करण्याचं जाहिर करतात.

होळी जाळण्यासाठी अख्खा गाव जमा होतो, स्त्रीया होळीचं पूजन करतात, लहानसहान पोरं आरोळी ठोकतात. आणि होळी पेटवली जाते. पण ह्या होळीसोबत गजू आणि त्याचे सहकारी मित्र गावातील देव-देवारे याचंही दहन करून गावाची कोसलन दूर करतात. ज्यामुळे सारा गाव कोसलनाच्या वर्तुळात अडकला होता त्यातून आता मुक्त झालेला असतो. अश्या कृतीने सारे ग्रामस्थ त्यांच्यावर नाराज होतात पण कोणातही गजू आणि त्याच्या सहकाऱ्यांविरोधात ब्र उच्चारण्याची हिम्मत होत नाही.

कालांतराने गजू त्याच्या मित्रांना शहरात जाऊन स्वतःची उन्नती करायला सांगतो. पण एक गावातला गृहस्थ जो काही वर्षांपूर्वी शहरात स्थायिक झालेला असतो तो गावी आल्यावर साधं दोन हितगुजाचे शब्द बोलण्यास तयार होत नाही. एकेकाळी हा गृहस्थ गजूशी घनिष्ठ होता पण शहरातल्या आधुनिकरणाच्या वाऱ्याने यांच्यात अंतर निर्माण केलं. असं आपल्याही मित्रांसोबत होणार नाही न? अशी शंका त्याच्या मनात उपस्थित होते पण त्याला त्यावेळी अडगावची अगोदरची स्थिती लक्षात आल्यावर त्याचा या शंकेला भुरळ पाडते.

टिप: कादंबरी वाचून 'कोसलन' या शब्दाचा अर्थ मी 'संकट' असा गृहीत धरला आहे. लेखकाने दूसऱ्या पण अर्थाने हा शब्द वापरला असेल असेल.

- प्रवीण जावळे.

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

सभ्य बलात्कार

भणंग रस्ते - कविता

नास्तिकाचं घर