ती सध्या काय करते. कथा

ती सध्या काय करते..?
          वाचन करण्यासाठी पुरेसा वेळ मिळाला होता म्हणून म्हटलं आज पुस्तक वाचावं. तसं पाहायला गेलं तर कोणत्याही गोष्टीसाठी वेळ हा मिळत नसतो तर वेळ काढावा लागतो. तर आज वाचनासाठी वेळ काढला. नेहमीची माझी आवडती, हक्काची जागा...चिमणी उद्यान. या जागेवर जाऊन वाचन करण्याचा आनंद वेगळाच आहे व अनुभवही. या उद्यानाचं खरं नाव 'स्वतंत्र सैनिक उद्यान' असलं तरी ओळख मात्र 'चिमणी उद्यान' या नावानेच होते. या उद्यानाच्या मध्यवर्ती भागात चिमणीच्या आकाराची प्रतिकृती आहे आणि या उद्यानाची कित्येक वर्षापासून निगा राखणारे काका...त्यांनी एकदा बोलता-बोलता सांगितलं की, काही वर्षांपूर्वी या उद्यानात चिमण्या यायच्या. त्यांचा किलबिलाट फार चालायचा इथे. यामुळे या उद्यानाला 'चिमणी उद्यान' नाव पडलं किंबहुना लोकप्रणित पध्दतीने मिळालं. तसेच माझ्या मते 'स्वतंत्र सैनिक उद्यान' खरं नाव देण्यास काही सामाजिक व राजकीय कारणं असतील.
          पुस्तक वाचताना त्यात रूळलो तर आजुबाजूला काय होतय हे लवकर लक्षात येत नाही. त्यावेळी मी पुस्तक वाचताना अचानक पाठीमागून माझे कोणीतरी डोळे झाकले. त्या हातांच्या मऊ स्पर्शाने सदर व्यक्ती मुलगी असावी, हे माझ्या ध्यानात आलं. पण नक्की कोण असेल हे लक्षात येत नव्हतं. मी अनुक्रमे नीलम, प्रज्ञा, मनोती, पूनम, ज्योती, सुनीता, रेखा, अक्षदा या मैत्रीणींची नावं घेतली. कारण असा खट्याळपणा यांच्याशिवाय कोणी करणार नाही हे मला माहीत होतं. परंतु ही सगळे तर्किक उत्तरे देऊन झाल्यावर सुध्दा डोळ्यांवरचा हात बाजूला झाला नाही. अखेर मी हार मानली.
     "बावळट, विसरलास न? मला वाटलं तुझ्या लक्षात असेल मी" डोळ्यांवरील हात बाजूला करून ती मला टपली देऊन समोर येऊन मिश्किलपणे रागवत म्हणाली.
      हिला पाहिल्यावर सुरवातीला लक्षातच आलं नाही की, ही कोण आहे? हिला का पाहिलय कधी..? पाहिलं असेल तर कोठे? चेहरादेखील आठवतोय. या प्रश्नांनी डोक्यात घोळ निर्माण झाला होता. अखेर हिला ओळखता न आल्यानं तिची ओळख तिच्या तोंडूनच ऐकावीशी वाटली. म्हणालो "नाही ओळखलं तुला"
     "विसरलास...? अरे आपण शाळेत एकत्र शिकायला होतो. इतक्या लवकर विसरलास पण? आणि तेही मला विसरलास? ही आश्चर्याची बाब आहे." माझ्याकडून तिच्या ओळखीचा सुगावा लागावा म्हणून ती मला काही गोष्टी सांगत होती.
     'शाळेत एकत्र होतो' यावरून मला चटकन लक्षात आलं. अरे, ही तर प्रियंका. "सॉरी...सॉरी...सॉरी लक्षात होतं मला पण आठवत नव्हतं"  मी माझी बाजू सावरण्यासाठी मोघम स्पष्टीकरण दिलं.
     "चल काहीपण. थापा मार आता. बाकी तुझी ही सवय अजुन तशीच आहे."
     "हो...हो. ते जाऊ दे, कशी आहेस?" मुद्दा बदलून प्रश्न विचारला.
     "मी ठीकये. तू कसा आहेस?"
     "मी पण ओके."
     "हल्ली काय बाबा तुम्ही मोठी माणसं झालात. आम्हाला ओळखत देखील नाहीत." तिने बाजूला बाकावर बसताना टोमणा मारला.
     "मी आणि मोठा? नाही...नाही. अजुन कश्यातच काही नाही." हसत हसत माझी खरी परिस्थिती सांगितली.
     "चल काही पण. फेसबुकला पाहिलं मी...फ्लिम वगैरे करतोस न? तसेच लिहितोस ही."
     "फ्लिम वगैरे काही नाही. शॉर्टफ्लिम काढत असतो तोडक्या-मोडक्या. लिखाणाबाबत बोलशील तर अजुनही मी शून्यच आहे. त्यामुळे चांगलं लिहितो हा तुझा गैरसमज आहे."
     "नाही रे पागल, छान लिहितोस. कविता तर छान असतात तुझ्या"
     "तुला कळतात माझ्या कविता?"
     "हो. म्हणजे प्रेमकविता आहेत त्या कळतात. बाकीच्या काही समजत नाहीत. पण आता तू समजवून सांगशीलच."
     "आता..?"
     "आता म्हणजे कधीतरी. आता तर आपली भेट झालीच आहे. मग सारखं भेटू...फोनवर बोलू."
"पण मी माझा नंबर नाही देणार तुला."
     "नको देऊस आहे माझ्याकडे."
"कसा काय? कोणी दिला?"
     "कोणी नाही दिला. मीच घेतला...फेसबुकवरून."
"अच्छा"
         काहीवेळ मी शांत राहिलो. विचार करत होतो की, ही फेसबुकवरच्या पोस्ट पाहत असते पण कधी हिने फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली नाही. हिच्याजवळ माझा नंबर आहे तरी कधी कॉल केला नाही किंवा एखादा मेसेज देखील. हे विचारावं का तिला? की नको?
    शाळेत सातवी नंतर हिची आणि माझी कधी गाठभेट झाली नाही. आज तब्बल आठ वर्षांनी ही भेटली. तेही अचानक. शाळेत पहिलीपासून आम्ही एकाच वर्गात होतो. आदर्श विद्यार्थी म्हणून आमच्या दोघांची ओळख. तिसरीपासून सातवीपर्यंत आम्ही दोघे वर्गमंत्री. वर्गात हीची आणि माझी स्पर्धा असायची की, कोणाला जास्त गुण मिळतात. प्रचंड मेहनती असल्याने हिने वर्गात प्रथम क्रमांक कधी सोडला नाही. यामुळे मी दुसऱ्या क्रमांकावर राहायचो. पण स्कॉलरशिपच्या परीक्षेत हिला पिछाडीवर सोडले. तेव्हा सर्वात जास्त आनंद हिलाच झाला होता. तशी ही माझी जीवाभावाची मैत्रीण होती. पण अचानक सातवीला असताना आमच्यात असलेली मैत्री संपुष्टात येता- येता अखेर संपली.
     झालं असं की, २६ जानेवारीला प्रजासत्ताक दिनादिवशी ध्वजारोहनाचा कार्यक्रम झाल्यावर मी व माझा मित्र दिनेश घरी जात होतो. हिने मला आवाज दिला. थांबवून सुरवातीला मला अभिनंदन केलं कारण जिल्हास्तरीय नवहिंद ज्ञानपीठ सामान्यज्ञान परीक्षेत मला द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक मिळालं होतं.
           'माझ्यासोबत एकट्यात बोलायचं आहे.' असं दिनेशला सांगून पुढे जाण्यास सांगितलं. अखेर तिने तेव्हा मनातली गुजगोष्ट व्यक्त केली. गुलाबाचं फूल माझ्या हातात देऊन "तू मला आवडतोस, माझं तुझ्यावर खुप प्रेम आहे."
       मला याबाबत काहीच कल्पना नव्हती. इतक्या वर्षापासून मैत्रीच्या पलीकडे हिच्याबद्दल विचार केला नव्हता. आज अचानक असं का बोलतेय हे मला त्यावेळी काही समजलं नाही. मुळात प्रेम या भावनेविषयी मी अनभिज्ञ होतो. घर, शाळा, अभ्यास यापलीकडे मी कसला विचार करत नसे. 'प्रेम करणं  चुकीचं आहे' अशी माझी त्यावेळेला धारणा होती. आणि कदाचित ती बरोबरही असेल किंवा चूक. एकतर या वयात प्रेम या भावनेची पूर्णपणे जाणीव नसते. आकर्षण ही बाब या वयातल्या प्रेमाला महत्त्वाची असते. तिचं हे प्रेम नसून आकर्षणच आहे हे मला कालांतराने घडत्या समजेनुसार कळलं होतं. पण त्यावेळी तिने प्रेम व्यक्त केलं म्हणजे एखादी चूक केली आहे हा माझ्या मनात गैरसमज तयार झाला होता. तिच्या या वागण्याला कसलीच दुषणे दिली नाहीत.
       "या गोष्टी मला चुकीच्या वाटतात म्हणून मी तुला होकार देऊ शकत नाही."असं सांगितल्यावर तिचं हृदय गहिवरून आलं होतं. तिला कळलं की, माझा तिच्या प्रेमाला नकार आहे. मी परत केलेला गुलाब तिने तिथेच फेकून दिला आणि तडक तिथून निघून गेली. दिनेश माझी वाट पाहत पुढे उभा होता. त्याला सगळं सांगितलं. त्यालाही असं काही होईल ही कल्पनाच नव्हती.
      "जिच्यावर वर्गातली कित्येक मुलं लाइन मारतात. ती त्यांना लाइन देत नाही आणि तिने तुला लाइन दिली?" तो आश्चर्यचकित होऊन म्हणाला. त्याचा यावर विश्वास बसत नव्हता.
     "ते जाऊदे रे... आता मी काय करू यार? ती रडत-रडत घरी गेली."
     "अरे...हो बोलायचं होतंस तिला. तुझ्यासारखीच हुशार आहे. दिसायला पण सुंदर आहे. तिच्यासारखी मुलगी नाही भेटणार तुला" दिनेशने सल्ला देण्यास सुरवात केली. पण मी माझ्या निर्णयावर ठाम राहावं असं ठरवलं.
      दुसऱ्या दिवशी वर्गात प्रवेश करताच हिची अन् माझी नजरानजर झाली. मी नेहमीप्रमाणे स्मित दिलं पण तिने काही प्रत्युत्तर दिलं नाही. नजर हटवून जागेवर जाऊन बसली. हिला पाहिलं तर डोळे लाल झाले होते. का ते माहीत नाही. मनात आलं विचारवं की काय झालंय पण स्वतःला रोखलं. कारण कालचं वागणं मला पटलेलं नव्हतं. मधल्या सुट्टीत जेवली नाही, वर्गात आज शांत होती, पी.टी.च्या तासाला तब्येत ठीक नाही म्हणून वर्गातच थांबली. आज तर पी.टी.च्या तासाला सरांनी खेळायला बास्केटबॉल आणला होता. बास्केटबॉल म्हटलं की ही खेळायला सर्वांच्या पुढे असे. वर्गात शिक्षक नव्हते तेव्हा वर्ग शांत करण्यासाठी उठली देखील नाही. बँचबर डोकं स्थिरावून झोपली होती.
      काही दिवसांपासून तिचं असं वागणं चालू झालं होतं. हिचा गृहपाठ पूर्ण नसायचा. कधी-कधी तर गैरहजर राहायची. कोणाशीच नीट बोलत नव्हती. शिक्षकांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देत नव्हती. कश्यातच हीचं लक्ष लागत नव्हतं. तिच्यात पूर्णपणे बदल झाला होता. असा विपरीत बदल होण्यास मीच कारणीभूत आहे. या कल्पनेने मी मनातून अस्वस्थ असायचो. त्यावेळी काय करावं हे सुचेनासं झालं होतं. तिला समजवण्यासाठी बोलायला गेलो तर माझ्याशी बोलण्याचं तिने टाळलं होतं.
       दिनेशला हा सगळा प्रकार ज्ञात होता. काय करता येईल म्हणून त्याला विचारलं तर त्याने "तिच्या प्रेमाचा स्वीकार कर..सगळं व्यवस्थित होईल." असं सांगितलं. नंतर माझ्यासमोर काही प्रश्न मनात उमटू लागले. जर हे माझ्या घरी कळालं तर..? वर्गात सरांना कळालं तर..? परंतु हिची ही अवस्था पाहवत नव्हती म्हणून तिच्या प्रेमाचा स्वीकार करण्याचं ठरवलं.
      मी तिच्या प्रेमाचा स्वीकार केलाय दिनेशकडून दुसऱ्या दिवशी तिला सांगितलं. तिच्या मनात अतोनात आनंद झाला होता. मग सुरू झालं आमचं प्रेम प्रकरण.
     "काय झालं..? असा शांत का झालास? कसला विचार करतोय?" मी शांत बसल्यामुळे विचारणा करू लागली.
     "काही नाही. असच." मी विचारांच्या गर्केतून बाहेर पडत बोललो.
     "एक विचारू का तुला?"
     "हो विचार"
     "तुझ्या मनात माझ्याबद्दल राग अजुन आहे का?"
     "खरं सांगायचं तर राग आला होता. पण तू त्यावेळेला त्या परिस्थितीनुरूप तुझं तसं वागणं साहजिक होतं. मला त्याबद्दल आता काही वाटत नाही. सुरुवातीला शाळेत असताना म्हणजेच लहान असताना तू अशी का वागलीस यामागचं कारण मला समजलं नाही. पण आता ते कळालं आहे."
      "मलाही आता वाटतंय की, मी फार मोठी चूक केली. असं सगळं तुझ्या माथ्यावर मारून स्वतःची सुटका करून घ्यायची नव्हती रे मला." तिचा आवाज काहीसा निवळता झाला होता. बोलण्यात अपराधीपणा जाणवत होता.
      "ठीक आहे...मला माहित्येय. आपल्याबद्दल तुझ्या घरच्यांना कळाल्यावर तुझे बाबा दुसऱ्या दिवशी शाळेत सरांजवळ माझी तक्रार करायला आले तेव्हा, 'सगळं मीच केलं आहे, म्हणजे तू माझ्या प्रेमात पडावं म्हणून मीच तुला गळ घातली आहे.' हे खोटं तू जेव्हा सरांसमोर तुझ्या बाबांना सांगितलंस ना...तेव्हा मला तुझा प्रचंड राग आला होता. खरं काय आहे मी सांगितल्यावर माझ्या बोलण्यावर तुझ्या बाबांनी विश्वास ठेवला नाही; त्यात तू दिनेश पण माझी बाजू घेतोय असं तू ठणकावून सांगितलंस. शिवाय जे मला चांगला विद्यार्थी म्हणून मानायचे, त्या शिक्षकांनी देखील माझ्यावर विश्वास ठेवला नाही. शाळेत सगळ्या शिक्षकांसमोर माझं नाव धुळीला मिळालं होतं.
    "हो रे. माझ्या या वागण्याचा त्यावेळी काहीच सुगावा लागला नाही. मी फक्त माझी बाजू सावरण्यासाठी तुला दोषी ठरवलं होतं. याचा तुला राग येणं साहजिक आहे. मला आता त्याची जाणीव झाली आहे की, मी त्यावेळी चुकले होते. मला असं वागायला नाही पाहिजे होतं. याच चुकीची माफी मागावी म्हणून खूप दिवसांपासून प्रयत्न करत होते. शाळेतून बाहेर पडल्यावर तुझ्यासोबतचा संपर्क खुंटला गेला. तुला संपर्क करण्यासाठी फेसबूकवर तुझं नाव सर्च केलं. नंतर तुला रिक्वेस्ट पाठवावी, तुझ्याशी बोलावं असं मनातून वाटत होतं परंतु तुझ्या मनात अजूनही माझ्याबद्दल राग असेल, तिरस्कार असेल म्हणून तुझ्यासोबत बोलण्याची हिंमत झाली नाही. तुझी या गार्डनबद्दल पोस्ट पाहिली तर कळालं की, तू दर रविवारी इथे येतोस. म्हटलं प्रत्यक्ष भेटून बोलावं. गेले तीन रविवार झाले इथं येत आहे, तुला पाहते आणि काही न बोलताच निघून जाते. आज अखेर हिंमत केलीच तुझ्यासमोर येण्याची अन् भेटले." माझ्यासमोर व्यक्त होण्याची सगळी धडपड एकसलग न थांबता सांगून टाकली.
"तुला एक सांगतो. तुझं त्यावेळीचं वागणं तेव्हा बरोबर होतं. तुला घरच्यांचा विश्वास तोडायचा नव्हता म्हणून मला दोषी ठरवलस. माझ्यावरील प्रेमापेक्षा घरच्यांचा विश्वास याला तू प्राधान्य दिलंस...महत्त्व दिलस. त्या क्षणाला मला तुझा राग आला पण कालांतराने तुझ्या भूमिकेची दूसरी बाजू तपासली म्हणजेच विचारात घेतल्यावर तुझ्यावरचा राग निघून गेला."
"म्हणजे आता तुझ्या मनात माझ्यावरचा राग नाही?"
"नाही. बिलकुल नाही."
"आणि प्रेम?"
"तेही नाहीच...खरंतर नव्हतच. माझ्या मनात तुझ्याविषयी काळजी होती, आपुलकी होती म्हणून तुझ्या प्रेमाला स्वीकारलं होतं."
"ओह माय गूडनेस. खरंच रे तू फारच वेगळा आहेस रे."
"ओह..थॅंक यु...एक विचारू? तू माझ्यात असं काय पाहिलस? ज्यामुळे तू प्रेमात का पडलीस..?" माझ्या मनात अचानक प्रश्न उमगला.
     "आता काय सांगणार याबद्दल..? पण बरं झालं हा प्रश्न विचारलास. तुला आताच म्हणाले न की, तू फारच वेगळा आहेस. तेव्हाही वेगळा वाटलास. म्हणजे एकदम साधा, कोणाच्या अध्यात नाही मध्यात नाही. सगळ्यांशी चांगला वागायचास. अभ्यासात तर हुशार, वर्गात जेव्हा शिक्षकांनी विचारलेल्या प्रश्नांची तू उत्तरे द्यायचास ना तेव्हा मी तुझ्याकडे पाहतच राहायचे. निबंध स्पर्धेत तर तुझा कोणीच हात धरू शकत नाही. अश्या हुशारीमुळेच शाळेत तुझं नाव प्रसिध्द होतं. आणि तुझा हा अबोल स्वभाव मला जास्तच भावला. त्यावेळेस तुझ्या प्रेमात पडणे हा वेडेपणाच होता माझा."
"वेडेपणा?" मी लगेच प्रश्न उपस्थित केला.
       "वेडेपणा म्हणजे मी लहान होते रे तेव्हा. पण आता प्रेम म्हणजे काय हे कळू लागले आहे. तुझ्यावरचं प्रेम म्हणजे लहानपणी नकळत्या मनात उमललेली फुलाची कोमल कळी होती. आणि अजूनही ती कळी तशीच आहे हृदयाच्या एका कोपऱ्यात."
  "छान उपमा दिलीस. तू पण कविता वगैरे करतेस वाटतं"
       "नाही...नाही. मला त्या फंद्यात पडायचं नाही रे बाबा. कविता आणि माझा काही सबंध नाही. मेडिकल फिल्ड निवडल्यावर माणसाने हळवं नसावं कधी. आणि तू तर पहिल्यापासूनच फार हळवा आहेस म्हणून तुला कविता लिहता येतात."
"कविता कसा काय लिहितो याबद्दलनंतर बोलेन...पण मला सांग तुझं काय चाललय. म्हणजे आता मेडिकल फिल्ड बोललीस म्हणून विचारतोय." तिच्याबद्दल आता जाणून घेण्याची इच्छा मनात येत होती.
         "मी पुण्याला शिफ्ट झाले दहावी झाल्यानंतर. आता सध्या मेडिकल करतेय. लास्ट इयरला आहे. फार छान चालू आहे माझं. मुंबईत ताईचं लग्न आहे म्हणून आले होते. उद्या जाणार आहे आले आहे तर तुला भेटावं वाटलं. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मला बॉयफ्रेंड आहे. मी पुन्हा तुझ्या आयुष्यात येईल हा विचार करू नकोस"
         "नाही...नाही बिलकुल नाही. हा विचार इतक्या दिवसांत आला नाही तर आता कसा काय येणार...तुझं इतकं चांगलं चालू आहे हे ऐकून बरं वाटलं."
    "हम्म...तुझ्या पण असतीलच..."
"असतील...?"
       "नाही म्हणजे शाळेत होत्या ना...जयश्री, निर्मला, श्रध्दा, सुचिता या तुझ्या प्रेमात होत्या. म्हणून बोलले असतील!"
    "अर्थात आहेत...पण शाळेत असताना प्रेमाच्या भानगडीत पडलो नाही पण कॉलेजला आल्यावर पडलो. आणि असतील म्हणण्यापेक्षा आहे...एकच. तिनेच प्रेमात पडायला भाग पाडलं."
     "वाव...म्हणजे अखेर तू प्रेमात पडलासच..! मी न फार खुश आहे माझ्या बॉयफ्रेंडसोबत..फार काळजी घेतो माझी."
  "ग्रेट...मी पण माझी जी आहे न तिच्यासोबत एकदम खुश आहे. मला हवी तशी मिळालीये."
   "छान...बरं झालं ना रे आपण असं भेटलो. मनात जे होतं ते सगळं सांगून टाकलं अगदी बिनधास्तपणे."
  "प्रियंका, मला तर वाटलं पण नव्हतं की आपली परत भेट होईल म्हणून. तुला तर विसरून गेलो होतो. आज तू भेटल्याने पुन्हा एकदा माझी जीवाभावाची मैत्रीण मिळाली. आपण आता वेळ असेल तर भेटत जाऊ...शिवाय माझं पुण्याला कामानिमित्त येणं असतं. पुण्याला आलो की कॉल करत जाईल."
        "हो नक्की...आज ना फार छान वाटतंय बघ मला. मनातलं सगळं तुला सांगून टाकलं जे खुप दिवसांपासून मनात तसच राहिलं होतं. पुन्हा एकदा मनापासून सॉरी...खरंच माझं तुझ्यावर अजुन प्रेम आहे."
"इट्स ओके यार..."
आज खुप दिवसांनी ही भेटली म्हणून फार बरं वाटलं. परत एकदा जीवाभावाची मैत्रीण मला मिळाली होती. झाल्या गेल्या भुतकाळातल्या गोष्टी स्पष्ट झाल्या होत्या. नंतर आमची एक जुनी आठवण अनुभवण्यासाठी शाळेजवळ असणाऱ्या श्रध्दा हॉटेलमध्ये जाऊन दोघांनी मिळून वडापाव खाल्ला. व पुन्हा अशीच भेट होण्यासाठी एकमेकांना निरोप दिला.
  - प्रवीण जावळे.

Comments

Popular posts from this blog

सभ्य बलात्कार

भणंग रस्ते - कविता

नास्तिकाचं घर