भणंग रस्ते - कविता
दिवसभर भणंग रस्ते चालून
गडद अंधारातली रात्र;
थकलेल्या शरीराची वामकुक्षी असते.
पण
तुझ्याकडे कललेल्या
अधीर मनाचं काय..?
अश्या गडद रात्रीत थकलेले डोळे
एकटक स्थिरावलेले असतात
तेव्हा-
तुझी प्रतिमा समोर उभी राहते.
हे थकलेले डोळे मिटल्यावर
उमटलेल्या काळोखातही
तुझी प्रतिमा स्पष्ट दिसत असते.
तुझ्या माधुर्य बोलक्या प्रितीच्या आभासाने
रात्रीचा विक्षिप्त खिन्न आवाज
बिलकुल जाणवत नाही.
कानांना तर सवय झालीये न–
तुझ्या बोलक्या प्रितीची.
तरीपण आज का न जाणे?
फोनवरील तुझा आवाज
अनोळखी वाटला.
ऐकण्याची सवय मोडली असावी(?)
तुझ्या ओठांतली शांतताही
बोलकी आहे हे ज्ञात असूनही...
का ओळखलं नाही मी?
कारण,
तुझ्या आवाजातली कोमलता
कोमेजून गेलीये बघ.
पुन्हा रुजव तिला,
मन फार खचलय तुझं...
सावर जरा त्याला,
काळजी घे...स्वतःची...
तुझ्या हळव्या मनाचं संगोपन
मला करता आलं नाही;
ते आता तुला करावं लागेल.
आणि माझं..?
''विसरले न मी तुला
तू मला विसरू नको.
छळतो तुझा अबोला हा
पुन्हा अशी रुसू नको"
मोबाईलमध्ये जपलेले
तुझे हे मंजुळ बोल,
वॉलपेपरवरील तुझा हसरा चेहरा,
अन्
तुझ्या सहवासातील गोड आठवणी-
या सगळ्या गोष्टींमधून
दूर असूनही माझ्यासोबतच आहेस तू.
म्हणून तर
'भणंग रस्ते' चालण्याचं सामर्थ्य मिळत आहे.
फक्त फोन करत जा
अधून-मधून...
- प्रवीण जावळे.
२८/०३/२०१७
०३:०५
Comments
Post a Comment