विजय असो - कविता
विssजय असो.
साहेबांनी त्याला
हातात भगवा झेंडा दिला
अन् सांगितले ओरडायला 'विजय असो'
तो कंठापासून ते बेंबीच्या देठापर्यंत
आकसून ओरडला
''विsssजय असो''
त्याचा आजचा पोटापाण्याचा प्रश्न मिटला.
साहेबांनी त्याला
हातात हिरवा झेंडा दिला
अन् सांगितले ओरडायला 'विजय असो'
तो कंठापासून ते बेंबीच्या देठापर्यंत
आकसून ओरडला
"विssजय असो"
त्याचा आजचा पोटापाण्याचा प्रश्न मिटला.
साहेबांनी त्याला
हातात निळा झेंडा दिला
अन् सांगितले ओरडायला 'विजय असो'
तो कंठापासून ते बेंबीच्या देठापर्यंत
आकसून ओरडला
''विssजय असो''
त्याचा आजचा पोटापाण्याचा प्रश्न मिटला.
साहेबांनी त्याला
हातात पिवळा झेंडा दिला
अन् सांगितले ओरडायला 'विजय असो'
तो कंठापासून ते बेंबीच्या देठापर्यंत
आकसून ओरडला
''विssजय असो''
त्याचा आजचाही पोटापाण्याचा प्रश्न मिटला.
पण आज त्याने स्वतःहून
हातात राष्ट्रध्वज घेतला
अन् सगळ्या साहेबांच्या विरोधात
शरीरातील रक्ताचा थेंब आटेपर्यंत बोलू लागला
मग सगळ्या साहेबांनी मिळून
त्याला संपवून
स्वतःच्या पोटापाण्याचा प्रश्न मिटवला.
काही दिवसात आपण सगळ्यांनी
''त्याचा' विssजय असो" म्हणत
हातात काळा झेंडा घेऊन
फक्त निषेध नोंदवला
नंतर
आपल्या पोटापाण्याच्या प्रश्नाच्या विचारात
आपल्याला 'त्याचा' विसर पडला.
- प्रवीण जावळे.
१८/०३/२०१७
०३.३२.
Comments
Post a Comment