काय लिहावं आणि काय लिहू नये. - कविता
काय लिहावं आणि काय लिहू नये.
खरं बोलत असलो तरीही
तुम्ही मात्र रागवू नका,
काय लिहावं अन् काय लिहू नये
हे मात्र तुम्ही सांगू नका.
साहित्य समाजाचा आरसा
सत्य कधी लपून राहील का?
निर्भीड लिखाण आमचं
वाभाडे काढायला मागे पुढे पाहील का?
सत्य नेहमी मांडायला
खोळंबा तुम्ही घालू नका.
काय लिहावं अन् काय लिहू नये
हे मात्र तुम्ही सांगू नका.
पिढीतांचं,शोषितांच,तळागाळातल्याचं
दुःख, वेदना साहित्यातून आम्ही मांडतो.
दुःखी जीवनातून मार्ग काढण्यास
प्रेरणा, नवी जिद्द निर्माण करतो.
दबलेल्या श्वासांचा आवाज दाबण्यासाठी
संस्कृतिचे स्वयंघोषित संरक्षक होऊ नका.
काय लिहावं अन् काय लिहू नये
हे मात्र तुम्ही सांगू नका.
जेव्हा अमानुष संस्कृतीविषयी
लेखणी आमची प्रश्न विचारू लागली.
तेव्हा तुमची तळपायाची आग
मस्तकात शिरू लागली.
प्रश्नांची उत्तरं देता न आल्यानं
आमचं रक्त पिऊन ढेकर देऊ नका.
काय लिहावं अन् काय लिहू नये
हे मात्र तुम्ही सांगू नका.
-प्रवीण जावळे.
Comments
Post a Comment