सभ्य बलात्कार
सभ्य बलात्कार
मध्यरात्री पेटलेल्या
सिगारेटच्या वासाने
'तिची' साखरझोप भंग झाली.
'त्याने' हातांवर-हात ठेवले,
ओठांना कुस्करून
जवळ घट्ट खेचून
त्याने शरीरावर झडप घालती
अन् सिगरेटचा उर्वरित धूर
तोंडावर सोडत 'तो' म्हणाला
"कर सुरू सगळं लवकर"
मध्यरात्रीच्या अंधारात
ती शोधत होती मुक्त प्रकाश
तिला वाटलं उठावं,
सोडावी परकी झालेली 'त्याची' मिठी
उघडावा बंदिस्त दरवाजा
अन्
निर्भीडपणे चालत राहावं
मुक्त प्रकाशाच्या वाटेवर
पण बंदीस्त दरवाजाच्या अल्याडचं जगच
तिला सुरक्षित वाटलं त्यावेळी
कारण दरवाज्या पल्याड असलेल्या
पोकळ सभ्यतेच्या जगात
याला 'बलात्कार' म्हणतात.
-प्रवीण जावळे.
०८/०८/२०१७
०३:०९
Comments
Post a Comment