उणीव - कविता
उणीव
रंगमंचावरील पहिलीच कामगिरी
मनात घबराट,जरासं दडपण
पण,मन स्थिर करत
भूमिकेवर लक्ष देऊ लागलो.
प्रयोग सुरु होण्यापूर्वी
पूर्वतयारीत एकटाच मग्न झालो.
कर्टनचा पुकार,प्रयोग सुरु,
विंगेत मी राहिलो स्तब्ध.
हात-पाय लटलट करत होते.
हृदय वेगाने धडधडु लागले.
दीर्घश्वास घेत इंट्री केली.
प्रेक्षकांची माझ्यावर नजर एकटक,
ही गर्दी पाहून थबकलो
पण केला निर्धार;
स्वतःला सर्वांसमोर सिध्द करण्याचा,
प्रेक्षकांच्या मनात ठसा उमटविण्याचा,
प्रयोगाला रंग देण्याचा.
भूमिकेला माझ्या सुरुवात झाली.
पहिल्या संवादालाच-
प्रेक्षकांचा मनमुराद प्रतिसाद,
टाळ्यांचा कडकडात,
शिट्यांची अवेरावी धामधूम,
आणि वा...वा ची हाक.
यामुळे वाढला आत्मविश्वास
प्रयोगात भूमिका बजावत
प्रफुल्लित उजाळा दिला.
प्रयोग संपल्यावर,
अनेकांनी माझी भेट घेतली.
कौतुकास्पद प्रतिक्रियांबरोबर
मोलाच्या मार्गदर्शन करत
शाब्बासकिने पाठ थोपटवली.
पण का न जाणे?
मला मिळालेल्या टाळ्यांत
मला मिळालेल्या शाब्बासकित
माझं कौतुक करणाऱ्या शब्दांत
मला भासली 'उणीव'
ती 'उणीव' होती;
लहानपणी बोट धरून
चालायला शिकवणाऱ्या बाबाची.
ती 'उणीव' होती;
लहानाचं मोठं करत,
अहोरात्र काळजी घेत,
संगोपन करणाऱ्या आईची.
ती 'उणीव' होती;
जिच्यासोबत
आयुष्याची स्वप्न रंगवत,
अनेक महत्त्वाकांशा पूर्ण करण्याचा
निश्चय करत,
स्वप्नात येणाऱ्या स्वप्नपरिची.
-प्रवीण जावळे.
१५/१०/२०१५
Comments
Post a Comment