कागद - कथा - १
कागद - कथा मध्यरात्री तिने पाहिलं तर विकास जागीच होता. टेबलवर पुढ्यात वही घेऊन लिहीत बसला होता. त्याच्या या सवयीची ओळख सुवर्णाला आता चांगलीच झाली होती. रात्री अपरात्री उठायचं, वहीवर काहीतरी लिहीत रहायचं. परंतु अजूनही तिला माहीत नव्हतं की, विकास नक्की काय लिहीत असतो. कितीतरी वेळा तिने याबद्दल विचारलं पण फक्त "काही नाही" यापलीकडे काही उत्तर नसायचं त्याच्याकडून आणि लिहून झालं की वही टेबल ड्रावरमध्ये लॉक करून ठेवत असे. लग्नाला काही महिनेच झाले होते. अरेंज मॅरेज. सुरवातीला छंद, आवड-निवड या मोघम गप्पांमधून विकासाला लिखाणाची आवड आहे असं तिला कळलं. एका दिवशी पहिल्यांदा असं मध्यरात्री तिने लिहिताना पाहिलं तेव्हा याचं तिला काही विशेष वाटलं नाही. रात्रीच्या शांततेत त्याला लिहायला सोपं जात असावं अशी तिने समजूत घालून घेतली. पण आता हे दररोजचं झालं होतं; दिवसभर व्यवसाय बघायचा, घरी येण्याची वेळही त्याची ठरलेली नसायची परत असं जागरण. अश्याने तब्येतीची काय हाल होतील याचा त्याला काहीच विचार का नाही? अजूनतरी विकासाने लि...