वेगळं मातृत्वाचं नातं - कविता
वेगळं मातृत्वाचं नातं
तशी तुझी अन् माझी
ओळखदेख बिलकुल नाहीये.
एका विलक्षण नात्याच्या संगतिने
तुझ्या अन् माझ्या नात्याची पायमुळं रोवलीहेत.
ममत्वाचं नातं जोडलंय मी तुझ्याशी
कारण एका विलक्षण नात्यातील प्रेमानेच
जुळवून आणलंय आपलं नातं
अचानक.
तुझ्या आयुष्याचा वर्तुळ
मला माहीत नाही
कसदार कष्टातून उभारी घेत
जगू पाहतेस
निर्मळ स्वच्छंदी आयुष्य.
अन् या प्रवासात तू कितीही थकलीस,
खचलीस तरी;
पुन्हा नव्याने उठून झगडतेस
मोकळ्या वाटेत पायात रुतणाऱ्या काट्यांशी.
एका त्रिज्येचाच प्रवास
तुझ्या तोंडून ऐकताना
शब्द हृदयात सलत होते,
माझ्या भुतकाळाकडे
मला नजर फिरविण्यास सांगत होते;
पण माझ्या भुतकाळाची
आठवण जरी आली की,
अश्रुंच्या बांधाना मोकळीक मिळते
अन्
ते सैलपणे बरसू लागतात.
पण तू तर,
दिवसभराची कुतरवढ जराही दिसू दिली नाहीस
इतके सगळे त्राण
किती सहजतेने लपवलेस तू
चेहऱ्यावरील तजेलदार स्मित हास्याने.
हेच खोटं स्मित
पांघरून घालत होतं तुझ्या भुतकाळावर
आणि वर्तमानावर देखील
पण एक लक्षात असुदे
भविष्यात तुझं खरं स्मित आणण्यासाठी
आता मीदेखील झगडेल
कारण मी तुझ्याशी मातृत्वाचं नातं जोडलंय
ते तुझ्याही नकळत.
- प्रवीण जावळे.
०७/११/२०१६ | ३.२९
Comments
Post a Comment