'आय लव्ह यू' बोलण्याचा खरा आनंद. ललित लेख

आय लव्ह यू' बोलण्याचा खरा आनंद.


 खरा आनंद हा आपल्याला मिळालेल्या आनंदात नसून; आपण दुसऱ्यांना दिलेल्या आनंदात असतो. माझ्या या मताबाबत मी निश्चित ठाम आहे, कारण आजवर मला आलेल्या वैयक्तिक अनुभवामुळे मी हे सांगू शकतो. मात्र याबाबत इतरांचं काय मत असेल? हे मी सांगू शकत नाही.

वर्षभरात अनेक घटना अवती-भवती घडल्या आणि त्यात नवीन असं काही नाही. प्रत्येकाच्या आयुष्यात कित्येक घटना घडतच असतात. पण घटनांचं गांभीर्य आपल्याला ओळखता आलं पाहिजे व त्या घटनांतून चांगल्या-वाईट गोष्टी ओळखून शिकता आल्या पाहिजेत. यासंदर्भातली एक घटना माझ्यासोबत नेहमी घडत असते आणि ती घटना प्रत्येकजण अनुभवत असणार...हे नक्की..!

तर ती घटना अशी...कॉलेज मधले सगळे लेक्चर्स झाल्यावर तिची आणि माझी भेट दररोज नित्यनियमाने व्हायची. मग त्या भेटीत रोमॅंटिक गप्पा मारत टिफिन किंवा कॅन्टिंगमधली फ्रैंकी, चायनीज भेळ, वडापाव खाण्याचा आमचा बेत ठरलेला असायचा. या दररोजच्या भेटीत नवीन असं काही नसे, यामुळे आज...म्हणजे त्या दिवशी जरा नाविण्य घडावं म्हणून कॉलेजबाहेर जाऊन वडापाव खाण्याचं ठरवलं.

कॉलेजपासून ५ ते ७ मिनिटे अंतरावर असलेल्या एका वडापावच्या दुकानाजवळ आम्ही पोहचलो. २ वडापाव घेतले. अर्थात मीच, कारण ती माझ्यासोबत असताना तिला पैसे खर्च करू देण्याची माझी इच्छा होत नसे आणि ती सुध्दा हक्काने मी दिलेल्या गोष्टी स्वीकार करत असे. यात आमच्या नात्याची विलक्षण आपुलकी असायची. तर आम्ही वडापाव खात असताना त्या ठिकाणी साधारणतः ८ किंवा ९ वर्षाचा मुलगा तिथे असलेल्या माणसांजवळ हात पसरत होता. त्याच्या हातात लोकांनी दिलेले अगोदरचे पैसे होते. अजुन पैसे मिळतील या आशेने तो सर्वांसमोर हात पसरवत होता. त्यावेळी काहीजण त्याला तिरस्काराने झिडकारत होते तर काहीजण टाळत होते. त्याला कोणाकडूनही कसलीच मदत मिळाली नाही. कदाचित मुंबईत असे शेकडो लोक आहेत जे हात पसरवून प्रत्येक दिवस ढकलत आहेत. दररोज असे लोक जागोजागी भेटत राहतात मग प्रत्येकाला मदत करावी तर महागाईने घातलेला खोळंबा आड येतोच. तसेच 'रोजचं मडं त्याला कोण रडं' या मानसिकतेमुळे या लोकांप्रती असलेली सहानुभूती राहिलेली नाही, असं म्हणता येणार नाही पण कमी झाली आहे...हे नक्की. तर तो मुलगा काहीवेळाने आमच्याजवळ आला. व्याकुळतेचा भाव चेहऱ्यावर ठेऊन तो एकही शब्द बोलला नाही पण त्याच्या कृतीतून भूक लागली असल्याची भावना त्याने व्यक्त केली होती. तो माझ्यासमोर उभा, माझ्या हातात वडापाव, तोंडात चावताना राहिलेला अर्धवट घास त्याला पाहुन मला गिळू वाटेना. त्याच्या हातावर काही रूपये ठेवले असते तर त्या रूपयांत समाधान मानून निघून गेला असता. पण त्या रुपयांत त्याची भूक मिटेल का? हा प्रश्न मला सतावत राहिला असता. म्हणून एक वडापाव घेऊन त्याला दिला. वडापाव दिल्यावर त्याच्या चेहऱ्यावर उमटणाऱ्या हास्याच्या वक्ररेषा त्याला मिळालेल्या क्षणिक आनंदाचा आविर्भाव स्पष्ट करीत होत्या. त्याला पाहुन नकळत माझ्याही ओठांवर स्मित उमटलं. वडापाव घेतल्यावर तिथून तो निघाला आणि मी त्याच्या पाठमोरा झालेल्या देहाकडे पाहत होतो. तो थोडासा दूर गेल्यावर मी नजर फिरवली व 'तिच्यासोबत' गप्पा मारू लागलो.

काहीवेळाने मला पाठीमागून कोणतरी हाताने टोकत असल्याचं जाणवलं. मी मागे वळून पाहिलं तर, एक स्त्री होती. तिच्या कडेवर तान्हं बाळ, केस काहीसे विस्कटलेले. बाजूला एका हातात मळक्या साडीचा पदर पकडून वडापाव खात असलेला मुलगा तिच्यासोबत होता. मी ज्याला अगोदर वडापाव दिला तोच मुलगा होता आणि ती स्त्री म्हणजे त्याची आई. तिच्या मुलाला मी वडापाव दिला असल्याचं तिला कळलं असावं म्हणून ती अजुन एखादा वडापाव मिळेल या आशेने माझ्याजवळ हात पसरवत होती. त्यावेळी मला एक प्रश्न पडला की, जर हिला एक वडापाव घेऊन दिला तर मी घरी कसा जाणार? कारण अगोदरच ३ वडापाव घेतले होते त्याचे ३० रूपये झाले होते. आणि माझ्याजवळ फक्त ४५ रूपये होते. बसने घरी जाण्यासाठी १४ रूपये लागतात. याचा विचार न करता अखेर अजून एक वडापाव घेऊन तिला दिला. वडापाव भेटल्यावर तिने आम्हाला स्मितहास्य दिलं व दोघेही तिथून निघून गेले. तिने जाताना दिलेल्या स्मितहास्यामध्ये तिचा मनात उमललेला आनंद जाणवत होता व आमच्यासाठी तिने सदिच्छा ही दिल्या होत्या.

काहीवेळात 'तिला' निरोप दिला. मी आणि 'ती' आपआपल्या घरी निघालो. मला घरी जाण्यासाठी चालत जाण्याशिवाय दूसरा पर्याय नव्हता. बसने जाण्यासाठी खिश्यात पैसे शिल्लक राहिले नव्हते. तसेच 'तिला' पैसे मागितले असते तर तिने दिलेही असते. पण स्वतःच्या सामर्थ्यवर केलेल्या मदतीचा आनंद वेगळाच असतो. तसं आमच्यात माझं-तुझं असं काही नसायचं जे काही माझ्याजवळ आहे ते तिचं. आणि जे तिच्याजवळ आहे ते माझं म्हणजेच आपलेपणाची भावना असायची. तरीपण मन प्रवृत्त करत नव्हतं. चालता-चालता खिश्यात हात टाकला तर पाच रुपयाचे नाणे शिल्लक राहिले होते. त्या पाच रूपयातून ३ सेंटर फ्रेश च्युंगम घेतले व जिभेवर रेंगाळत त्या च्युंगमचा फुगा फुगवत- फुगवत घरी आलो. त्या दिवशी मला माझा अभिमान वाटला. वाटलं की, मी दुसऱ्याला क्षणिक आनंद देऊ शकलो.

२०१६ हे वर्ष सरत आलं. काही दिवसच राहिले होते वर्ष संपायला. नवीन वर्षाची सुरवात नवे संकल्प डोळ्यासमोर ठेवून करावी व वर्षाच्या अखेरीस नेक काम करावं असं वाटू लागलं. मात्र त्यासाठी काय करावं? हे सुचत नव्हतं.
३० डिसेंबरला कॉलेजमध्ये नाटकाची तालीम करून घरी निघालो. भूक लागली होती म्हणून त्याच दुकानावर ज्या दुकानावर वरची घटना घडली तिथे वडापाव खाण्यासाठी गेलो. यावेळी 'ती' नव्हती. एकटाच वडापाव खाल्ला. वडापाव खाताना ही घटना आठवली. आयुष्यातली न विसरता येणारी ही घटना असल्याने याची आठवण आल्याशिवाय राहिली नाही. जास्त भूक लागली असतानाही का न जाणे फक्त एक वडापाव खाऊन पोट भरल्यासारखं वाटलं. एरवी जास्त भूक लागल्यावर ३ वडापाव मी फस्त करत असे. मग वडापाव खाऊन तिथून निघता-निघता एक कल्पना सुचली. म्हटलं या घटनेचा पुन्हा अनुभव मी घेऊ शकतो. आणि नवीन वर्षाच्या सुरवातीला पुन्हा इतरांच्या चेहऱ्यावर आनंद आणता आला तर काहीतरी अभिमानास्पद काम करून मला माझा अभिमान वाटेल हे नक्की..!

मनातल्या मनात नियोजन केलं. कामांची आखणी केली. सगळ्यात अगोदर घरी जाऊन अडचणीला कामी येणारा माझा परम् मित्र 'पिगी' त्याला गाठलं. काही महिन्यांपासून रोज खिश्यात जमा होणारी चिल्लर त्यात जमा करत असे. काही वेळेला जास्त पैसेही. त्यातली काही रक्कम घेतली. ठरवल्याप्रमाणे हवे इतके पैसे त्यातून मला मिळाले. तसेच माझ्याजवळ काही पैसे होतेच. पैसे घेऊन पहिल्यांदा कुर्ल्याला माझ्या छोट्या ताईला भेटलो. ही माझी ताई कुर्ल्याला फुलांचा छोटा व्यवसाय करते. लहानशी टोकरी घेऊन कुर्ला स्टेशनच्या मधल्या ब्रिजवर फुले विकत असते. या छोट्या ताईकडून गेल्या एका वर्षापासून ज्या-ज्या वेळी कुर्ल्याला जातो तेव्हा तिच्याकडून नेहमी आईसाठी गजरा आणि 'तिच्यासाठी' चाफ्याची फुले घेत असायचो. त्यामुळे हिच्यासोबत माझी चांगली ओळख झाली आहे. पण या छोट्या ताईची आणि माझी कित्येक दिवस झाले भेट झाली नव्हती.

"काय रे दाद्या? कुठं होतास इतक्या दिवस ? बहिणीला विसरलास वाटतं." तीचं हे बोलणं ऐकून ती माझ्यावर रुसली असल्याचं मला जाणवलं.

"इतके दिवस आलो नाही म्हणून तर आज आलो आहे न...बरं ते जाऊदे, हे घे...तुझ्यासाठी आणलीये...हॅपी न्यू इयर इन अड्वान्स" मी तिच्यासाठी आणलेली डेरी मिल्क सिल्क देत म्हणालो. कॅडबरी पाहताच तिचा राग गेला व हसून तिने हातातली कॅडबरी घेऊन मला एक बाइट भरवली.

"दादा, वहिनी कशी आहे रे?" मध्येच तिने विचारलं.

"एकदम मजेत" कॅडबरीचं बाइट तिला भरवत म्हणालो.

"हो ते तर असणारच...तू मजेत तर ती पण मजेत असणारच...मला कधी भेटवणार आहेस?"

"भेटवेन...लवकरच"

"तू हे दरवेळेस बोलतोस. कधी भेटवशील काय माहीत." तेवढ्यात ती काही चाफ्याची फुले आणि गजरा बांधत होती. मी तिला थांबवलं."काय झालं रे" 

"थांब. हे नकोय. एक काम कर हे १०० रूपये घे आणि मला उद्या फूले घेऊन ये...चाफ्याची...याच वेळेला मी उद्या येईल."

"इतकी ?..नक्की काय करणार आहेस दादा? काय वर्षभराची एकदाच देणार आहेस का वहिनीला?" तिने हसत हसत मला टोला लगावला.

"तसं काही नाही...तुझे जो बताया है वो कर...बाकी बड़बड़ मत कर . चल, कल मिलता हूँ।" हसत-हसत तिला निरोप देऊन निघालो.

अखेर ३१ डिसेंबरचा दिवस उजाडला. कॉलेजमध्ये नाटकाची तालीम झाल्यावर अगोदर कुर्ल्याला गेलो. कुर्ल्यात काल जाता-जाता मॉनजीनिज् शॉपमध्ये अड्वान्स १०० पेस्ट्रिजची ऑर्डर दिली होती. पेस्ट्रीज घेऊन चाफ्याची फुले घेण्यासाठी छोट्या ताईजवळ गेलो. तिने तयार ठेवलेली चाफ्याची फुले घेतली. त्या फूलांमधून दोन फुले घेतली आणि एक पेस्ट्री घेऊन छोट्या ताईला देताना 'आय लव्ह यु' बोललो.

आय लव्ह यु बोलल्यावर तिच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह उमटलं होतं. "दादा, तुला काय झालय रे ? मला काहीच कळत नाहिये. मला आय लव यु का बोलतोयस?"

"कुछ नही रे पगली...तुझ्यावर प्रेम भरून आलंय" तिला पडलेल्या प्रश्नाचं मलाही नीट उत्तर देता न आल्यानं अंदाजे तिला हे उत्तर दिलं.

"मला तुझं तर काहीच कळत नाही बाबा...जाउदे दे ते फूल..."तिने ते चाफ्याचं फूल घेतल्यावर मी पण लवकर माझी पुढची कामं करण्यासाठी निघालो.

हा सगळा उपद्व्याप थोडक्यात...ज्यांच्या आयुष्यात परीस्थितीने कायमचा अंधार माखून ठेवलेला आहे त्यांच्या आयुष्यात आज एक किंचित आनंद देण्याचा प्रयत्न मी करणार आहे. हो...! चाफ्याचं फूल देऊन...चाफ्याचं फूल हे आमच्या प्रेमात मध्यस्थी साधणारं असल्याने चाफ्याची फूले खरेदी केली होती. आणि आज थर्टी फर्स्ट आहे...कित्येक जणांचा पार्टीचा बेत असेल मग केक कापून काहीजण नवीन वर्षाचं स्वागत करतील. पण ज्यांना एका वेळेचं अन्न मिळत नाही ते केक कुठून आणतील? त्यांना हे नवीन वर्ष आनंदाचं असेल का? म्हणून केक ऐवजी पेस्ट्री. कदाचित माझ्या या कामामुळे त्यांना दोन मिनिटांचा आनंद मिळाला तर हा क्षण माझ्यासाठी अविस्मरणीय राहील. जगात कित्येकजण आहेत जे प्रेमळ मायेला मुकले आहेत त्यांना मी ' आय लव्ह यु' बोलून मी प्रेम व्यक्त केलं तर माझ्या मनाला अकथनीय आनंद मिळेल. याची सुरवात तर माझ्या छोट्या ताईपासून तर केली होतीच. मग कुर्ल्याजवळ काही निर्वासितांना पेस्ट्री आणि चाफ्याची फूले दिली व त्यांच्याप्रति माझ्या प्रेमभावना व्यक्त केल्या. उर्वरित फूले, पेस्ट्री घेऊन घरी निघालो. घरी जाताना घरच्यांसाठी देखील थोडीफार खरेदी केली होती.

१० वाजण्याचा सुमारास घरी पोहचलो. इतक्या पेस्ट्री आणि फुले पाहून लहान भावाने याबद्दल विचारलं. मी त्याला याचं काही स्पष्टीकरण दिलं नाही. फ्रेश झाल्यावर जेवण केलं. जेवण झाल्यावर वर्षाचा शेवटचा दिवस साजरा करण्यासाठी आईने खीर बनवली होती. ती खाल्ली. तसेच मित्रांचे सगळे प्लान झाले होते. त्यांचे कॉल आले. वर्षभर काम, कॉलेज आणि नाटकाची तालीम यामुळे मित्रांना पूरक वेळ देता आला नाही. त्यामुळे त्यांची माझ्याविषयी नाराजी होती, माझ्या वाढदिवसाला तरी मी त्यांच्यासोबत असेल अशी त्यांना खात्री होती. तीदेखील निष्फळ ठरली. वाढदिवसाच्या दिवशी कविसंमेलनालामुळे मुंबई बाहेर गेलो होतो. याची त्यांना कल्पना नव्हती. त्यांनी वाढदिवसाला दरवर्षीप्रमाणे मला वेगळ्या पध्दतीने धक्का देऊन वाढदिवस साजरा करण्याचा प्लान आखला होता पण मी मुंबईतच नसल्यामुळे त्यांचा प्लान फसला. शिवाय त्यादिवशी माझा मोबाइलही बंद...परंतु आता त्यांना वेळ देता येत नसल्याचं कारण त्यांना समजलं असेल. म्हणून सगळी नाराजी विसरून त्यांनी थर्टी फर्स्ट साजरा करण्यासाठी मला बोलावलं. परंतु मी माझं स्वतःच नियोजन केलं असल्याने त्यांच्यात जाऊन नवीन वर्ष साजरा करता आलं नाही. फक्त त्यांना सुभेच्छा दिल्या.

रात्रीचे १२.०० वाजले. घराच्यांसोबत नवीन वर्ष साजरा करून मी ठरवलेलं काम करायचं राहिलं. चाफ्याच्या फुलांची पिशवी, पेस्ट्रीजची पिशवी घेऊन निघालो. जात असताना वडीलांनी टोकलं. "इतक्या रात्री या पिशव्या घेऊन नक्की चाललास कुठं?" हा सवाल विचारल्यावर मी शांतपणे "कुठे नाही. घरी आल्यावर सगळं सांगतो" याबद्दल काही न सांगता घराबाहेर पडलो. माझ्या या कामासाठी मदत म्हणून लहान भावालाही सोबत घेतलं. तसा तोही जाणून घ्यायला उत्सुक होताच की, मी नक्की काय करणार आहे?

सव्वाबाराच्या सुमारास मी, माझा लहान भाऊ आणि माझी प्रेयसी म्हणजे माझी सायकल. असे आम्ही तिघे पेस्ट्रीज् आणि चाफ्याची फुले घेऊन निघालोत. आजुबाजूला लोक रस्त्यावर सगळीकडे नवीन वर्षाचा धुमाकूळ करत होती, होटल्स मध्ये गर्दी, रस्त्यावर ठिकठिकाणी मैत्रीतली गंमत सुरू होती, तर काही ठिकाणी तळीराम मंडळी बेधुंद होती. हे सगळं चित्र आम्ही दोघे पाहत-पाहत मला माहीत असलेली काही ठिकाणे जिथे निर्वासित लोक असतात. कॉलेजला जाताना, कामावर जाताना ज्या रस्त्याने प्रवास करत असायचो तिथली काही ठिकाणे माहीत होती. ती म्हणजे गोल्फ क्लब, अमर महलचा सिग्नल, अजिज बाग, राजावाडी हॉस्पिटल जवळील सिग्नल, स्वस्तिक पार्कचा सिग्नल, पांजरपोळ जवळील सिग्नल, देवनार कत्तलखाना जवळचा फुटपाथ ही काही जवळपासची ठिकाणं मला माहीत होती. यांपैकी ठराविक ठिकाणीच जाऊन तिथल्या लहान मुलांना नवीन वर्षाची ही भेट दिली 'आय लव्ह यू' बोलून प्रेम व्यक्त करता आलं. काही ठिकाणं राहिली कारण पेस्ट्रीज् आणि फुले संपली असल्याने घरी जावं लागलं. मला याची कल्पना होतीच की, या पेस्ट्री कमी पडतील. पण जितकी रक्कम माझ्याकडे होती त्यातच मला हे करता आलं. पण पुढच्या वर्षी म्हणजे २०१८ ला जमेल तितक्या मोठ्या स्वरुपात करण्याचा प्रयत्न करणार आहे.

माझ्या कार्यात मोलाचा सहभाग असेल तर माझ्या परिवाराचा...त्यांनी माझ्यावर दाखवलेला विश्वास. अपरात्री मला बाहेर जाऊ दिलं तेही मी काय करणार आहे? याची काही माहिती नसताना. फक्त माझ्या शब्दावर त्यांनी विश्वास ठेवला. तसेच प्रखर थंडीतही माझ्यासोबत सायकलच्या मागच्या सीटवर सगळं साहित्य संभाळत बसलेला माझा लहान भाऊ याचा, माझ्या आयुष्याची सोबती म्हणजे 'ती'. तिच्या सान्निध्यात असल्यानेच मला याची कल्पना सुचली व प्रत्यक्षात उतरविण्याची मानसिक तयारी झाली. आणि काम हे सोप्पं झालं ते म्हणजे माझ्या गर्लफ्रेंड सायकल (तिच्याबद्दल नंतर सांगणारच आहे. हिची वेगळीच गोष्ट आहे.) आणि सर्वात महत्त्वाचा वाटा असेल ते म्हणजे मुंबई पोलीस; मी अपरात्री घराबाहेर जाऊन परत सुरक्षित घरी आलो याचं एकमेव कारण म्हणजे त्यांचं रहदारीचं कर्तव्य. 

हा माझा नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशीचा अनुभव कायम लक्षात राहील. पुढील वर्षी म्हणजे २०१८ ला हे माझं काम अजुन मोठ्या स्वरुपात करेल याचा मी नक्कीच प्रयत्न करीन. आणि सगळं लिहिण्याचा उद्देश हा नाही की, मी फार महान काम केलय. फक्त एक सांगू इच्छितो की, आनंद ही वाटून घेण्यासारखी गोष्ट आहे. आणि इतरांच्या परिस्थितीला डोळसपणे पाहण्याची वृत्ती असुद्या. मग परिस्थिती चांगली असो किंवा वाईट. आपल्या परीने त्यांच्यासाठी जे काही करता येईल ते करा.

-प्रवीण जावळे.
- 8286644504
jawalepravin04@gmail.com

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

सभ्य बलात्कार

भणंग रस्ते - कविता

नास्तिकाचं घर