आधार शब्दांचा - कविता
शब्दांच्या दुनियेत वावरताना
विपर्यास गेलेले शब्द
राहिले नाहीत नजरेसमोर
काही शब्द नजर चुकवून
मला टाळत होते
काही शब्द आवर घालून
मला दिलासा देत होते
पण काही शब्द तर
जवळदेखील करत नव्हते
कधी विस्तवाचं वर्णन
शब्दांनी माझ्यासमोर उभं केल्यावर
त्याची झळ मनाला लागत होती
आणि काही शब्द सहानुभूतीने
शहारणारा हळवा स्पर्श
गवसणी घालीत होता
फाटक्या मनाला अन् दृष्टीहिन भावनांना
हृदयात कोंदलेलं आच्छादन
भरण्यासाठी
कधी शब्दांची सोबत होती
म्हणून रेखाटू शकलो
आपल्या आठवणी
अलवार मिठीतल्या,
पहिल्या प्रेमळ स्पर्शाच्या,
कधीही न विसरू शकणाऱ्या
मनमोहक क्षणांच्या
कधी याच शब्दांनी
एकांती देहाला काही काळ साथ दिली
कसोटीचे क्षण ढकलण्यासाठी
पण फक्त शब्दांच्या सहवासात
जीवन जगणं असफल ठरतय
तुझी उणीव असल्याने
कारण शब्दांचा सहवास
नेहमी तुझी आठवण काढण्यास प्रवृत्त करतोय
पापण्यांच्या आड
जन्म घालणाऱ्या आसवांच्या
या विरही क्षणी
मनाला फुंकर घालून
उभारी येण्यास सांगितलं मनाला
तरीही
मनातल्या इच्छा,
मुक्त जगण्याच्या प्रतिमा,
बेधुंद संचारण्याची शैली
मोडीत काढता आली नाही
फक्त
स्वप्नांची झालर दिसली
प्रत्येक शब्दांच्या अर्थमागे
या स्वप्नातली नवसंजीवनी होतीस अगोदर
पण आता मला
शब्दांच्या आधारे जगायला सांगून
तुझ्या नात्याचा आधार संपवून
मला तू
निराधार तर करत नाहीस ना..?
- प्रवीण जावळे.
Comments
Post a Comment