निष्ठुरतेची फ्रेम. कविता

निष्ठुरतेची फ्रेम

आठवणींच्या वहीतल्या कागदाचा
अन् पेनातल्या शाईचा
अट्टहास न करता लिहावं म्हणतोय,
रंगवावीशी वाटतायेत
थंडीत गोठलेली गात्रे.

प्रखर थंडीत गुरफटत असायचा
उबदार आळस पांघरलेल्या शालीतला
ना पावसाची रिपरिप 
ना कडक उन्हाचा त्रास
ना घामाचा वैताग
सगळं काही विलग व्हायचं
कडकडत्या थंडीत.

उललेल्या ओठांवर
हास्य उमलायचं कमी
तरी...
ओठांना भेगा पडेपर्यंत हसायचं
हास्यकट्टा रंगायचा पहाटे-पहाटे
पेटत्या शेकोटीची ऊब घेत.

सकाळच्या विसाव्याचा
पातळ थर ओझरल्यावर
पुन्हा जिवांची ओढाताण सुरू व्हायची
ती दिवस सरेस्तोवर.

जस-जसा भुतकाळ गमावला
अन् आता वर्तमानाचं पांघरुण घेतल्यावर
आठवतंय सगळं;
सकाळचं कोवळं ऊन येईस्तोवर
रणरणत्या पेटातून
ऊब देणारी शेकोटी
आज मात्र हरवलंय सगळं
इमारतींच्या जंगलात

जिथं...नेहमी दिसते;
चोवीस तास
निष्ठुरतेनं बंद झालेली फ्रेम.
निष्ठुरतेनं बंद झालेली फ्रेम.

-प्रवीण जावळे.

१३/०१/२०१६

२३.१३

Comments

Popular posts from this blog

सभ्य बलात्कार

भणंग रस्ते - कविता

नास्तिकाचं घर