मध्यरात्री आलेली जाग - कविता


मॉर्निंग वॉकला गेल्यावर...
फिगर मेन्टेन ठेवून
बॉयफ्रेंडला इम्प्रेस करणारी ती दिसली.
याने तिला स्माइल देत 'गुड मॉर्निंग' म्हटलं
तिने मात्र विश्वसुंदरी असल्याचं भासवून
'इडीयट' म्हणत कडवट स्माइल दिली.

ऑफिसला जाताना
स्वतः प्रेस केलेले कपडे घालून,
कोऱ्या चहाचा घोट घेऊन
तिने तयार केलेला टिफिन घेताना हा म्हणाला.
'आज शिवाजी अंडर ग्राउंड इन भीमनगर मोहल्ला हे नाटक पाहायला जाऊ.
ती म्हणाली.
'आज शक्यच नाही...
राणाचं लग्न होणार आहे,
ते मला मिस करायचं नाही.'

ट्रेनमध्ये...
वीतभर जागेत
एका पायावर उभे राहणारे,
धक्का लागताच आई-बहिण काढणारे,
मोबाइलमध्ये डोकं खुपसून
कैंडी क्रश सागाची लेवल पूर्ण करणारे,
फेसबुकवर सेल्फी अपलोड करून
'आज 1k लाइक क्रॉस करणारच'
हे ध्येय ठेवणारे ध्येय वेडे,

'परदेसी परदेसी जाना नही
हमें छोड़के....हमे छोड़के'

दाद मिळण्यापेक्षा दाम मिळावे यासाठी पोटतिडकीने गाणारे दुर्लक्षित कलाकार,

ऑफिसमध्ये...
बॉस आणि सेक्रेटरीविषयी चर्चा...
आय.पी.एल मॅचवर चर्चा...
सेल्स प्रमोशन,
बॉसने दिलेल्या टारगेटवर चर्चा...

सोसायटीमध्ये
जयंती साजरी करण्याच्या बैठकीत
मंजूर झालेले ठराव;
वर्गणी मजबूत जमा झाली पाहिजे,
सगळीकडे बॅनर लागले पाहिजे,
बॅनरमध्ये साहेबांचा फोटो मोठा दिसला पाहिजे.
इतरांपेक्षा आपली जयंती हटके झाली पाहिजे,
साहेब आले की, त्यांच्या जंगी सत्कार आणि तडफदार भाषण झालच पाहिजे,
डीजे लागलाच पाहिजे.
पण याचा ठराव मात्र मंजूर झालाच नाही.

हा मध्यरात्री उठून
पेन घेऊन कागदावर लिहित बसला.
तेव्हा ती म्हणाली...
'अहो, काही फायदा नाही याचा.
सगळे झोपले आहेत...तुम्हीपण झोपा.'
त्याने कागदारची नजर न हटवता म्हणाला...
'तू जागी झालीस...हीच माझी सुरवात आहे. बाकी सगळे उठतीलच.'

- प्रवीण जावळे.

२५/०४/२०१७
०३.५३.

Comments

Popular posts from this blog

सभ्य बलात्कार

भणंग रस्ते - कविता

नास्तिकाचं घर