कॉफी आणि ती
कॉफी आणि 'ती'
"मी सगळ्यांपासून अलिप्त राहायला पाहतेय तर पुन्हा सगळं आठवतंय. जेवढा दूर जाण्याचा प्रयत्न करतेय तेवढा अधिक त्रास होतोय. काल अचानक त्याने हाक मारली. मला वळून पाहायचं नव्हतं पण पहिल्या हाकेत तो परिचयाचा वाटला नाही मला. तशी तेवढी जवळीक नव्हती त्याची आणि माझी. रेल्वेस्टेशनवरील इतक्या गर्दीत त्याने मला ओळखलं होतं. मी त्याच्याकडे पाहून नजर चोरून निघून जात होते. पण तेवढ्यावर तो थांबला नाही. त्याची पावले गर्दीतील माणसांना धक्के देत माझ्याकडे येत होती. मी मात्र त्याच्यापासून जेवढं दूर जाता येईल तेवढं दूर जात होते. परंतु दोष काय आहे त्याचा तरी? का टाळतेय मी त्याला? अन् त्यालाही जसं काहीच माहीत नाही तसं वागतोय. मी थांबायला हवं होतं का त्यावेळी? खूप दिवसांनी आमची गाठभेट झाली असती पण मी ठरवलं होतं त्याच्यासहित सगळ्यांपासून दूर राहायचं आणि जरी सोबत राहिले असते तर त्यांनी मला स्वीकारलं असतं का? सगळ्यांच्या नजरा मी घोर कृत्य केलंय अश्याप्रकारे दिसल्या असत्या. खरंतर माझं धाडसही होत नाही त्यांना सामोरं जाण्याचं. पण हा तर...म्हणजे मला पाहून माझा पाठलाग का करत होता. का थांबवत होता? काय बोलायचं असेल? काय प्रश्न असतील त्याच्या मनात? मी असं का केलं याबद्दल विचारणार होता का तो? पण त्याला माहित झालं असेल का? हो नक्कीच माहीत झालं असेल. तरीही याला माझ्याशी भेटून बोलावसं वाटलं होतं. मी पण काय विचार करत बसलीये. सोड. झालं गेलं गंगेला मिळालं." सुस्कारा सोडत उत्कर्षा बेडवरून उतरली.
रविवार असल्यावर उशीरा उठणे हे तिचं ठरलेलं होतं. घर सगळं पसाऱ्याने गजबजलेलं होतं. एवढ्या मोठ्या घरात एकटीनं राहण्याची सवय करून घेतली होती तिने. कॉफी घेऊन सगळं काही व्यवस्थित करता येईल अश्या बेताने ती किचनकडे वळली. जाताना रेडिओवर तिची नजर गेली. तिला आठवलं कितीतरी दिवस झाले आपण रेडिओ ऐकला नाही. लहानपणीच्या खूपश्या आठवणी ताज्या होतात हा रेडिओ पाहिल्यावर. माणसाचं वय वाढत जातं आणि कालांतरानं जीवन संपुष्टात येतं पण यंत्रांचं काय? त्यांचं जीवनमान अधिक काळ अबाधित राहत असतं फक्त हाताळताना काळजी घ्यावी लागते.
तिने रेडिओ सुरू केला. फ्रिजमधून दूध काढून गरम करायला ठेवले. तोवर दोर बेल वाजली.
"आता या वेळेला कोण असेल." ती पुटपुटली. दरवाजा उघडला तर समोर हाच.
"गुड मॉऱ्- गुड आफ्टरनून" त्याने हातातल्या घड्याळात वेळ बघितली.
त्याला असं अचानक पाहून काय बोलावं ते कळेना. उत्कर्षा त्याला पाहत राहिली. अखेर हा घरापर्यंत आला. तिच्या चेहऱ्यावर आलेलं किंचित ओघळ हास्य गळून पडलं.
सौभाग्ये या सुरात तारा, त्यातून अचपळ खेळे पारा |
अलख निरंजन वाजविणारा, सहजपणात प्रवीण ||
अलख निरंजन वाजविणारा, सहजपणात प्रवीण ||
झिणी झिणी वाजे बीन, सख्या रे अनुदिन चीज नवीन || रेडिओवर गाणं सुरू होतं.
"बोरकर न?" उत्कर्षाला पाहून म्हटला.
"अ...काय?" तिच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह उमटले.
"तुम्ही नाही. हे जे गाणं ऐकू येतंय त्याबद्दल बोलतोय. बोरकरांचे शब्द आहेत न?" मिस्कीलपणे बोलला."
"हो बहुतेक."
"बरं मी असाच उभा राहू की आत येऊ. काही पाणी वगैरे विचारणार आहात की नाही?"
"हो ये. बस"
"बरेच दिवस झाले भेट झाली नाही आपली. कित्येकदा इकडे कामानिमित्त येत असतो. काम झाल्यावर भेटेन म्हणतो पण वेळच मिळत नाही. पण आज म्हटलं काहीही झालं तरी तुम्हाला भेटून जायचं असं ठरवूनच आलो होतो. तुम्हाला फोन केला दोनेकदा. पण बंद येतोय. नंबर बदलला वाटतं तुम्ही."
"हो. तो नंबर बंद झाला. बरं कुणालजी मी आलेच." पाण्याचा ग्लास हातात देऊन उत्कर्षा किचनकडे निघून गेली.
"तुमची बोलायची सवय अजून तशीच आहे. साधं सरळ कुणाल म्हणा न. 'जी' जोडल्यावर वय झालं आहे असं वाटतं. आणि मी जेवण करून आलोय काही खायला आणू नका. एक कप कॉफी मिळाली तर उत्तम." कुणालला वाटलं त्याच्या येण्याने उत्कर्षाला दडपण वाटू लागलं आहे. कुणालला सर्व काही माहीत होतं आणि याबद्दल आपल्याला काही माहीत नाही असंच वागायचं असं ठरवून आला होता.
पाणी पिऊन ग्लास टेबलवर ठेवला. त्याची नजर समोर असलेल्या पारितोषिके, सन्मानचिन्ह यांच्याकडे गेली. उठून त्याने एक पारितोषिक हातात घेतलं. पारितोषिकावरील 'प्रथम क्रमांक - उत्कर्षा सुजय गावित' हे नाव उठून दिसत होतं. कविता स्पर्धेत मिळालेलं हे पारितोषिक. ज्या कवितेसाठी मिळालं त्या कवितेने साऱ्या सभागृहात कान सुन्न करून टाकले होते. खऱ्या अर्थाने सादरीकरणाने कवितेला प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवून दिलं होतं. कवितेत आक्रोश होता; अमानुषपणे बलात्कारपीडित तरुणीचा. तिच्या काही दोष नसताना मृत्यूशी झुंज देऊन अखेर तिने अखेरचा श्वास घेतला होता.
"कुणालजी कॉफी." उत्कर्षाने कॉफी आणून टेबलवर ठेवली.
"मॅम, छान दिसतायेत सगळ्या ट्रॉफीस्. किती मस्त दिवस होते ते. कविता, कविसंमेलने, कार्यक्रमांचे दौरे; ट्रॉफीस् पाहून पुन्हा आठवलं सगळं. ही ट्रॉफी ज्या कवितेसाठी मिळाली होती त्या कवितेचं नाव काय? सॉरी, मॅम खरंतर मी विसरलोय म्हणून विचारलं." कॉफीचा घोट घेत कुणालने विचारलं.
"निष्पाप" तिच्या बोलण्यात कापरेपणा होता.
"हा...निष्पाप. तुमच्या इतर कवितांपेक्षा ही कविता अधिक धाटणीची ठरली. म्हणूनच तर इतक्या दिग्गज कविंमध्ये तुम्हाला पारितोषिक मिळालं होतं. मॅम एखादी कविता होऊन जाऊद्या न. कितीतरी दिवस झाले तुमची कविता वाचायला मिळाली नाही न ऐकायला. आज योग जुळून आलाय तर प्लिज." कुणालने आग्रह केला.
"नको कुणालजी. नको वाटतयं आता. ज्या शब्दांनी अनेक लोकांसोबत मला जोडलं होतं; वाटलं होतं ती आपली जिवाभावाची आहेत पण सगळं फोल ठरलं. त्यांच्याप्रमाणे हे शब्ददेखील परके झालेत माझ्यासाठी."
"त्यांनी तुम्हाला परकं नाही केलं उलट तुम्हीच त्यांना परकं समजलं."
"पुरेशी माहिती नसताना काहीही बोलू नये कुणालजी. आणि प्लिज मला यावर काही बोलायचं नाहीये." उत्कर्षाने कप टेबलवर ठेवला तेव्हा कॉफी उसळून पडली. तिला राग आला होता.
"पुरेशी माहिती? कसली? तुम्हाला काय वाटतं मला काही माहीत नाही. मला सगळं काही माहीत आहे. आणि मी पण यावर बोलायला आलेलो नाहीये."
"मग का तो विषय काढताय. मान्य करते की माझी चूक झाली. सगळ्यांनी मला कायमसाठी दूर केलंय ही मला शिक्षा देखील मिळाली आहे. आणि प्लिज यु कॅन लिव्ह नाऊ."
"मॅम, मी हेच सांगतोय की, दूर त्यांनी नाही तुम्ही स्वतःच त्यांच्यापासून दूर झालात. तुम्ही कोणाशी का बोलला नाहीत. मी तर किती कॉल केले तुम्हाला पण तुम्ही एकही कॉल घेतला नाही."
"कसं सांगणार कुणालजी? सांगण्यासारखं आहे का? ज्यांना सांगून मनमोकळं करावसं वाटलं, स्पष्टीकरण द्यावं वाटलं त्यांनी तर संपर्कात न राहण्याचं ठरवलं होतं माझ्या. मी त्यांना जवळचं समजत होते तेच असं वागायला लागले मग इतरांकडून काय अपेक्षा ठेवणार?"
"निदान माझा कॉलच उत्तर तरी द्यायचं होतं."
"धाडस होत नव्हतं उत्तर देण्याचं. असली बाब सर्वांसमोर आल्यावर मी ठरवलं आता सगळ्यांपासून दूर व्हायचं. कुणाशीही संपर्क नाही ठेवायचा."
"पण असं करून तुम्ही स्वतःच्या प्रतिभेचा गळा घोटला आहे. मला माहीत आहे तुमच्यासाठी तो काळ फार कठीण होता. सुरुवातीला मला कळाल्यावर मलाही वाटलं होतं की तुमच्याशी संपर्क तोडलेला बरा परंतु मन मात्र याला तयार नव्हतं. मी ज्याप्रमाणे साहित्यात माझी मत मांडतो त्या मतांशी आणि तुम्हाला ज्या दृष्टिकोनातून पाहत होतो यात खूप काही विसंगती होत आहे यामूळे अस्थिर होतो. तुम्हाला भेटण्यासाठी खूप प्रयत्न केले होते." तेवढ्यात कुणालचा फोन वाजतो.
"हॅलो, अरे बापरे आलीस तू . सॉरी, अजून माझं काम झालं नाही. हो हो म्हटलं होतं अगं पण महत्त्वाचं काम निघालं म्हणून वेळ लागला. सॉरी,कामाच्या ओघात राहून गेलं. नाही नाही येतो पाच मिनिटं. प्लिज प्लिज. आलोच. हो हो अगदी. बरं तू ठेवशील तर मी निघेन न. ओके, आलोच." कुणालने फोन ठेवला. निघण्याची घाई करू लागला.
"कोण प्राजु आहे का? उत्कर्षा आपला अंदाज खरा आहे याची खात्री करण्यासाठी विचारले."
"नाही. प्राजु नाही. मैत्रीण आहे. बरं सॉरी मॅम, मला निघायला हवं. खूप उशीर झालाय." कुणाल राहिलेली कॉफी ठेवून निघू लागला.
"अरे उरलेली कॉफी संपवून जा न."
"अरे हो एक गोष्ट विसरलोच." कुणालने बॅगेतून एक कागद काढून तिच्या हातात ठेवला. "हे घ्या."
"काय आहे?" आश्चर्याने विचारले.
"उघडून तर पहा." तिने लिफाफा फाडून कागद उघडला. "कॉफी, तुम्ही पत्रस्वरूपात लिहिलेली कथा. अर्धवट वाटते. लवकर पूर्ण करा. मी पुन्हा येईल वाचायला. तेव्हा सगळी कॉफी पिऊन जाईल. येतो मॅम बाय."
उत्कर्षाने त्याच्याकडे पाहिलं नाही. कागदावरील कथेकडे एकटक स्थिर नजरेने पाहू लागली. डोळ्यातून हळूहळू अश्रू ओघळून अर्धवट राहिलेल्या कपात पडले.
Sundar ...
ReplyDeleteमनःपूर्वक आभार प्रतिक्रियेबद्दल.
Deleteअप्रतिम
ReplyDeleteमनःपूर्वक आभार प्रतिक्रियेबद्दल.
Deleteसुंदर... मस्त मांडले आहेस
ReplyDeleteमनःपूर्वक आभार प्रतिक्रियेबद्दल
DeleteNice 👌👌
ReplyDeleteखूप मस्त👌
ReplyDeleteकागदावरील कथा आम्हालाही वाचायची आहे 👍
Mast
ReplyDeleteतुझे शब्दांनी मनात विचारांची कुस्ती केली. वाह
ReplyDelete