मर्द को कभी दर्द नही होता।
'मर्द को कभी दर्द नहीं होता।'
'मर्द' सिनेमा आल्यापासून हा संवाद प्रत्येकाच्या डोक्यात इतका घट्ट बसलाय कि, तो आता बाहेर पडणं किंवा विसरणं अशक्य आहे. हा संवाद पुरुषांच्या तोंडातून सर्वाधिक ऐकायला मिळतो. परंतु हा सिनेमा बाजूला ठेवून याचा विचार केला तर. खरंच मर्द म्हणजे पुरुष यांना वेदना होत नाही का? वेदना काय फक्त स्त्रियांना होतात असं आहे का? पुरुषांचं शरीर दगडापासून किंवा धातूपासून बनलेलं असतं का? याचा सारासार कल्पकतेच्या पलीकडे जाऊन कुशल बुद्धीने विचार केला तर याचं उत्तर 'नाही' असं आहे. आता मर्द (पुरूष) आणि स्त्री म्हणजे कोण? किंवा आपल्याला स्त्री-पुरुष अशी ओळख कशी मिळते?
जन्म झाल्यावर आपण मानव प्राणी म्हणून जन्माला येतो. त्यावेळी आपल्याला 'आपण स्त्री आहोत की पुरुष.' हे बिलकुल कळत नसतं. आपल्याला निसर्गतः मिळालेल्या रचनेवरून स्त्रीत्वं, पुरुषत्वं बहाल केलं जातं. त्यानंतर तशीच कपडे घातली जातात मग त्याच प्रकारची कपडे कायमस्वरूपी घालावी लागतात. हे झालं दिसण्यावरून. आणि मानसिकरित्या आपल्यावर जी जडणघडण होत असते त्यासाठी समाज कारणीभूत असतो. समाजात असलेल्या तत्वानुसार संस्कार होत असतात. अगदी लहानपणापासून घरातली मंडळी 'तू मुलगा आहेस...तू मुलगी आहेस.' असं सांगतात. समाजात स्त्री-पुरुष समानता व्हायला हवी असं नेहमी म्हटलं जातंय. पण स्त्री-पुरुष समानतेची शिकवणूक असमानता शिकवून केली जात आहे हे कोणाला जाणवत देखील नाही. असमानतेचे विचार प्राचीन काळापासून आलेले आहेत यात कुटुंब सदस्यांचा पूर्णपणे दोष नाही. सामाजिक, धार्मिक परंपरेनुसार आपली जडणघडण होत असते. मग आपण 'स्त्री' व पुरुष म्हणून ओळखले जातो.
पुरुषांच्या बाबतीत नेहमी म्हटलं जातं की, पुरुष हे कणखर असतात, बळकट असतात. हि दोन लक्षणं असणे म्हणजे पुरुष आहोत म्हणजेच मर्द असं समजलं जातं. स्त्रियांच्या बाबतीत 'स्त्रिया या बावळट आणि कमकुवत असतात. वरील दोन्ही समज (गैरसमज) आपल्याला पाहायला मिळतात. आणि हे चुकीचं आहे असं पुरुषाला वाटत नाही व स्त्रियांनाही. याचे परिणाम (दुष्परिणाम) प्रत्यक्ष दिसत नाहीत परंतु यामुळे स्त्री-पुरुषांना व्यक्ती म्हणून पाहण्याची दृष्टी अंध होत चालली आहे.
सुरवातीला म्हटल्याप्रमाणे 'मर्द को दर्द नही होता.' खरं म्हणजे वेदना (दर्द) हि शारीरिक असो किंवा मानसिक याचे परिणाम दोघांनाही सारखेच होतात, दोघांनाही तितकाच त्रास जाणवतो. परंतु या त्रासाला सामोरं जाण्यासाठी स्त्री आणि पुरुषांकडे संरचना भिन्न स्वरूपाची आहे. मुक्का मार लागला तर हाडांना त्रास होणार; हे तर सगळ्या सजीव प्राण्यांमध्ये दिसून येतं. पुरुषांना एखादा शारीरिक त्रास झाला तर ते मुकाटपणे सहन करतात. हि त्यांची म्हणे सहनशक्ती असते. याउलट स्त्रीया रडत राहतात. हि दोन लक्षणे भिन्न स्वरूपाची आहेत. तसेच जे पुरुष अश्यावेळी रडत नाहीत ते पुरुष (मर्द) मानले जातात. आणि स्त्री नेहमी रडत असते म्हणून तिला कमी समजणे किंवा ती कमजोर असते हे मानणे. हे दोन्ही भाकीत चुकीचे आहेत. खरंतर स्त्रियांमध्ये रडण्याची क्रिया ही वेदनांची दाहकता कमी होण्यासाठी निसर्गतः असते. ती एक ताण कमी करणारी विरेचण प्रक्रिया आहे. मुद्दा सहनशक्तीचा आलाय म्हणून स्त्रीया तर पुरुषांपेक्षा जास्त सहनशील असतात. त्यांच्यात सहनशक्ती पुरुषांपेक्षा अधिक असते. प्रसवतेच्यावेळी (प्रेग्नेंट) त्यांना जो काही त्रास सहन करावा लागतो ज्या काही वेदना होता त्या वेदना कोणताही पुरुष सहन करू शकणार नाही. त्या रडतात तेव्हा त्यांचा ताण कमी होतो, मन हलकं होतं. स्त्रियांना ज्या शारीरिक किंवा मानसिक दबावातून जावं लागतं त्या सगळ्यांना तोंड देण्यासाठी हि एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. पुरुष मात्र याउलट असतात. त्यांच्या डोळ्यातून सहजता अश्रू येत नाहीत. परंतु ते रडत नसल्याने त्यांच्या अंतर्मनात एक दबाव तयार होतो त्या दबावाचा उद्रेक त्यांच्या हिंसक वागण्यातून बाहेर पडत असतो. यातून मला हेच म्हणतायचं आहे की, स्त्री- पुरुष यांचं रडणं म्हणजे यांच्या योग्यतेची कसोटी बिलकुल नाही. जे पुरुष रडतात ते बायकी ठरतात हे समजणे संकुचित विचार असण्याचं लक्षण आहे. उलट तणावात असताना पुरुष जितकं रडतील त्यांना तितकं बरं वाटेल.
पुरुषांना कमी लेखण्यासाठी 'हातात बांगड्या भर.' असं सर्रासपणे बोललं जातं. आणि जर एखाद्या स्त्रीने कर्तबगार कामगिरी केली तर तिला मर्दानी म्हंटलं जातं. त्याचबरोबर एखाद्या स्त्रीला मनमोकळंपणे बोलायला आवडत असेल तर ती चालू आहे (उपलब्ध आहे) असं गृहीत धरलं जातं. या सगळ्यांचा विचार केला तर हा एकाप्रकारे स्त्रियांचा अपमान होत नाही का? हो...निश्चितच अपमान होतो आहे. आणि पुरुषांवर महानतेचं दडपण लादून त्यांचंही मानसिक खच्चीकरण करण्यात येतं.
बांगडी हा स्त्री सौंदर्य खुलवणारा दागिना आहे. बांगडी आणि कर्तबगारी याचा परस्पर काहीएक संबंध नाही. नको त्या गोष्टींशी संबंध जोडण्यात आपण नेहमी पुढारलेले आहोत. पुरुषांना हातात बांगड्या भरायला सांगणे हा पुरुषांचा अपमान नाही तर यामधून स्त्रीया कर्तबगार नाहीत असं सिद्ध होतं. खरंतर कोणत्याही बाबतीत स्त्रिया पुरुषांपेक्षा कमी नाहीत प्रत्येक क्षेत्रात पुरुषांच्या बरोबरीने त्यांनी हक्काचं स्थान मिळवलं आहे. परंतु याचं मोजमाप पुरुषी प्रतिकांनीच केलं जात आहे. उदा. तिला मर्दानी म्हणणं, ती पुरुषांसारखी खमकी आहे म्हणणं. मुळात असं म्हणण्याची बिलकुल आवश्यकता नाहीये. एखाद्या स्त्रीने स्वकर्तृत्त्वावर मजल गाठली तर तू माझा मुलगी नाहीस मुलगा आहेस असं घरात म्हटलं जातं. स्त्रियांच्या कर्तबगारीला पुरुषांच्या तुलनेनं मोजण्याची काही गरज नाही. पुरुषांनाही स्त्रियांच्या क्षमतेवरून टोमणे मारून हिनवणं हे पण चुकीचं आहे.
एकंदरीत शेवटी म्हणेन की, स्त्री असो वा पुरुष दोघांचं वेगळेपण आहे. निसर्गतः दोघांत मानसिक, शारीरिक वेगळेपण आहे. त्यांच्या उणीवा सखोल समृद्ध मनाने स्वीकारायला हव्यात. त्यांना स्त्री किंवा पुरुष म्हणून वागणूक देण्याऐवजी व्यक्ती म्हणून वागणूक दिली गेली पाहिजे. काळ बदलतो तशी परिस्थिती बदलत असते त्यामुळे मानवतेच्या सर्वांगीण विकासासाठी आपण प्रगती पथावर चालताना विवेकबुद्धीने विचार करून चालणं आवश्यक आहे. जेणेकरून येणारी पिढी हि 'व्यक्ती' म्हणूनच जन्माला येईल आणि घडेल.
वेदनादायक आहे ही समाज्याची व्यथा.
ReplyDeleteखुप चांगल्या विषयावर सखोल आणि मार्मिक विचार मांडुन एक दिशा दिली आहेस.