कमिटमेंट

   
      तो मला माणूस म्हणून भावला होता. खरंच प्रेमात जात,पंथ,धर्म,वंश,रंग हे सगळे भेद त्याला अमान्य होते. आणि हे मला त्यानेच पटवून दिलं होतं.
पटवून दिल्यानंतर "मी बोलतोय हे सगळं अगदी बरोबर असेल असं नाही तुझ्या अंतर्मनाला पटलं तर नक्की विचार कर." म्हणजे सगळं सांगून झालं तरी माझं म्हणणं म्हणजे सगळं खरं आहे हे ठणकावून न सांगता उदारमताने विचार व्यक्त करणं फार भावलं होतं. तसेच वरून इतका रुक्ष वाटणारा आणि जहाल विचार करणारा हा इतका रोमँटिक असेल याची कल्पनाच नव्हती. कवितांची डायरी त्याला न सांगता चाळली तर त्याच्या सगळ्या कविता या त्याच्याच आहेत का हा प्रश्न पडला? कवितेतली त्याची प्रियसी अन् तिच्याभोवती घुटमळणाऱ्या याच्या रोमॅंटिसीजमच्या काव्यपंती हे विशेष लक्षण. याच इतकं हळवं मन असू शकेल असं वाटलं नव्हतं. हा नसला तरी याच्यातल्या कवीचं मन हळवं आहे हे नक्की.
"फार रोमॅंटिक आहेस रे तू तर!" त्याची खोड काढत म्हटलं.
        "म्हणजे?"
"ये सब कविताए कह रही है जनाब." त्याची डायरी त्याच्या हाती ठेवत म्हटलं.
        "या सगळ्या कविता आणि प्रेम हे सगळ्यांना आता काही अर्थ नाहीये. ते जाऊदे उद्या सकाळी लवकर निघ. कारण उद्या मंत्रालयात शिक्षण खात्यातला एका अधिकाऱ्याशी माझं बोलणं झालंय. तुझं काम होईल कदाचित." त्याने विषय बदलला लगेच परंतु असं निराश होऊन त्याचं बोलणं मनाला हूरहूर लावून गेलं होतं.
ध्येयशील, आशावादी, प्रसंगी खंबीर भूमिका पेलवणारा हा असा कसा काय बोलू शकतो? हा प्रश्न मला पडला होता. मला आठवतंय अजूनही इथे मी एकटी असताना याने मला केलेली मदत; त्यावेळी माझ्यामागे खंबीरपणे उभे राहणे. मी माझं कुटुंब, माझा देश ओलांडून नव्या सामाजिक जाणिवांच्या शोधात इथे आलेली असताना याने प्रत्येक प्रसंगी मला साथ दिली होती. युनिव्हर्सिटीत एम.एच्या ऍडमिशनच्या रांगेत कर्मचारीसोबत शाब्दिक चकमकीत याने मलाही साथ दिली. कोण कुठला? ओळखदेख अजिबात नाही तरी माझ्या बाजू रेटून धरली याने.
      "माझ्या बाजूने का बोललात? तुम्ही तर मला ओळखत देखील नाही." हे विचारलं तर म्हणाला "मी खऱ्याच्या बाजूने होतो. तुमची बाजू खरी नसली असती तर नसतो बोललो काही." ही आमच्या मैत्रीची सुरवात होती. त्यांनतर काही दिवसांत झालेल्या गाठीभेटी मैत्रीतलं अंतर कमी करून मैत्री दृढ करत गेल्या. त्याच्या सहवासात राहणं म्हणजे जणू अम्मी माझ्यासोबतच आहे असं वाटायचं. आईने जशी काळजी घ्यावी तशी काळजी त्याच्या लाघवी बोलण्यातून दिसून यायची. अम्मी तर नेहमी फोनवर सांगायची की,ऐऱ्यागैऱ्याशी मैत्री अजिबात करू नकोस. परंतु हा कधी परका वाटला नाही. अनोळख्या वाटेवर ओळखीचा वाटसरू भेटावा तसा हा मला अनोळखी देशात भेटला. इथे आल्यावर काही दिवस निपचित पाऊल टाकत राहिले होते. आता तर कसली काळजी नाही वाटत. कारण हा कसल्याही अडचणीत माझ्यासोबत असायचा नेहमी.
मार्क्सवाद, फॅसिसम, रिडॉल्स रेवुलेशन, जागतिक दहशतवाद, माझ्या देशात थैमान घालत असलेल्या सामाजिक समस्या, आरोग्य, शिक्षण या सगळ्या मुद्द्यांच्या सामाजिक जाणिवांच्या जवळ चर्चा करता दिवस कसा सरायचा हे आमचं आम्हालाही कळत नव्हतं.
"प्रेम आणि क्रांती यात काही फरक असतो का?" मला वाटलं मी काहीतरी बावळटासारखं विचारलं आहे. यावर त्याच्या उत्तरात मात्र सामाजिकता आलीच.
        "आमच्या देशात प्रेम करण्यापासून क्रांतीची सुरवात होते. समाजाला सहज न पचणारा विषय आहे हा. प्रेम करणे म्हणजे हा सामाजिक गुन्हा समजला जातो आमच्याकडे त्याला शास्त्राची संगत देऊन हे सगळं संस्कृतीला घातक आहे रेटून सांगितलं जातं सर्रासपणे."
"म्हणून प्रेम करणं सोडलंय का कुणी तुमच्या देशात? प्रेमात कुणी आडवं नाही येत नाही आणि आलं तरी त्याला क्षमवून पुढे जाण्याची ताकद प्रेमात आहे." मी ठामपणे बोलले.
         "पुढे म्हणजे काय तर लग्न? इथे ज्यांना एकमेकांशी लग्न करावी वाटतात त्यांना ती करू दिली जात नाही. मुलगी पाहण्याचा एक भंकस कार्यक्रम आयोजित केला जातो. खरंतर माझा याला विरोध नाही पण ज्याप्रकारे लग्नाचा सामाजिक व्यवहार होतो हा मला अजिबात मान्य नाही कारण प्रेम हीच मानवी संस्कृती आहे. आणि प्रेमात जात,धर्म,वंश,रंग,आर्थिक आधार त्याचबरोबर देशाच्या परस्पर सीमा ही असली कसलीच बंधने नसावीत मी तर या मताचा आहे.
____________________________________________
"देशाच्या सीमा ओलांडून प्रेम करणाऱ्या कथा पुस्तक वाचल्यात आणि सिनेमात पाहील्यात पण प्रत्यक्षात याचा कधी विचार आला नाही. याने दिलेला मदतीचा हात हळूहळू काळजीत दिसू लागला. मला कसलाही त्रास होऊ नये याची काळजी हा वाहू लागला. मैत्री ही प्रेमात रूपांतरित तर होत नाही न? इतकी आपुलकी त्याने माझ्याप्रति दर्शवणे हे प्रेमाच्या भावनेतून होत नाही न?आणि मलाही दिवसभर याच्याच संगतीत असावंसं वाटतं. त्याच्या मनात खरंच प्रेमभावनेची हुरहूर तर नाही न माझ्याप्रति? नसेल. मग नसेल तर माझी इतकी काळजी का असते त्याला? असेल तर नक्की विचारेल. परंतु इतके दिवस झाले याबाबत बोलला का नाही? धाडस नसेल झालं का? बहुतेक. मी पुढाकार घेऊ का? नको...त्याचा मनात असं काही नसेल तर..." मोबाईलची टोन वाजताच मी विचारचक्रातून भानावर आले. पाहिला तर याचाच फोन. रात्रीचा दीड वाजला आहे तरी हा झोपला नाही. आणि यावेळी काय काम असेल? माझ्या मनात या विचाराने पण घर केलं.
       "वाटलंच मला तू झोपली नसशील, बरं सगळी तयारी झालीये न? सकाळी लवकर निघायला हवं. ठीक सकाळी ४.३० मी घ्यायला येईल मी तेव्हा तयार रहा. येतोय तुला सोडायला काही काळजी करू नकोस. फक्त वेळेत उठ म्हणजे झालं." त्याने फोन ठेवला.
इतक्या दिवसाची सोबत आता संपणार होती. माझ्या देशात परतण्यासाठी माझं पाऊल पुढे सरकत नव्हतं. असं का होतंय आणि असं कधी झालं नाही. हा मात्र मला भेट म्हणून आणलेली पुस्तके घेऊन पुढ्यात अम्मीशी बोलत होता. आता अम्मीचाही याने विश्वास जिंकला होता.
         "इतकी शांत का झालीस आज? कसला विचार सुरू आहे आल्यापासून? काही बोलली पण नाही एअरपोर्टवर येईपर्यंत. जायचं नाही वाटतं मॅडमना?" अम्मीसोबत त्याचं बोलणं संपलं.
त्याच्याकडे पाहिलं आणि कसलीही पर्वा न करता मिठी मारली. "आय लव्ह यु" बोलून अखेर माझ्या मनात सुरू झालेलं प्रेमाचं स्पंदन मोकळं केलं.
त्याच्याही चेहऱ्यावरचं हास्य ओझरून गेलं. कारण त्याला याची कल्पना नव्हती.
"मला उत्तराची अपेक्षा आहे. आत्ताच; ते काहीही असलं तरी चालेल." मी बोलले.
        "तुझ्या भावनांचा मी आदर करतो. परंतु मी तुला नाही स्वीकारू शकणार. मी अगोदरच एकीसोबत नात्यामध्ये आहे." त्याच्या बोलण्यात गहिरता जाणवली. डोळ्यात ओलावा दिसू लागला.
"कुणाशी?" माझा प्रतिप्रश्न.
      "आहे एक परंतु आम्ही वेगळे झाले आहोत."
"म्हणजे? कधी नाही सांगितलंस याबद्दल "
     "हो सांगावंस नाही वाटलं. सोप्या भाषेत सांगायचं तर आमचं ब्रेकअप झालंय आणि अजूनही मी तिच्यावर तितकंच प्रेम करतोय. पुन्हा होईल सगळं व्यवस्थित."
"असं आशेवर राहणं ठीक वाटतं का?"
      "माहीत नाही. तिच्याशिवाय कुणाशी नातं जुळवावं ही भावना येतच नाही."
"म्हणजे तिच्याशी तू अजूनही कमिटेड आहेस."
        "हो. पुढे काय होईल ते माहीत नाही. आणि प्रेम म्हणजे लग्न व्हायलाच पाहिजे असं नाही. नातं जरी तुटलं तरी प्रेम तसच राहतं. माझं तिच्याप्रति प्रेम अजून तसंच आहे."
त्याचं हे रूप जाणवल्यावर मनात त्याची नवी छटा उमटली होती. व्यवहारी झालेल्या जगात कमिटमेंट काय असते याने मला शिकवलं होतं. प्रेम केल्यावर लग्न झालंच पाहिजे असं नाही नातं नसलं तरी प्रेम तसंच राहतं. या देशातल्या  प्रेमाचा हा नवा अर्थ उलगडून सांगण्याऱ्या ह्या रोमँटिक क्रांतीकारकाच्या प्रेमात नव्याने पडले होते पुढे आमचं काय होईल ते माहीत नाही पण मी ह्याच्याशी आता कमिटेड आहे.
- प्रवीण जावळे.
02/06/19 ।।   3.38AM

Comments

Popular posts from this blog

सभ्य बलात्कार

भणंग रस्ते - कविता

नास्तिकाचं घर