तिची इच्छा _ डायरी नोट
शेवटचं बोलणं होतं आमचं. यानंतर पुन्हा कधी भेट होईल(?) सांगता येत नाही. इतक्या दिवसाचे सोबती होतो आम्ही पण खरंच आम्ही एकमेकांचे सोबती होतो का? हा प्रश्न आज स्पष्ट झाला होता. मला त्याच्या आयुष्यात काहीच स्थान नाही आहे हे नेहमी जाणवायचं तरीही मी दुर्लक्ष करून नातं पुढे बहरावं यासाठी प्रयत्न करायचे. खरंतर नातं दोघांचं आहे म्हटल्यावर दोघांनीही यात हातभार लावला पाहिजे. मी एकटीच बळ लावत होते अन् शेवटी थकले मी. रथाचं चाक असं कुठवर ओढणार? सांग न? नाही म्हणजे...मी आता कसला जाब विचारत आहे, किंवा तक्रार करत आहे असं अजिबात नाही बरं.
तसा यासाठी तुला कुठे वेळ भेटणार आहे? हे सगळं शुल्लक वाटणार तुला. म्हणजे बघ न तुझं मन करेल तेव्हा तू बोलायचा, भेटायचा. अन् त्या बोलण्यात, भेटण्यात कधीही माझ्याविषयी विचारलं नाही की कशी आहेस? अगदी सुरवातीपासून कधीही असं बोलला नाहीस. भेटल्यावर तुझ्या उपयोगी असलेल्या गोष्टींवर चर्चा करायचास. काहीवेळ चित्रपट पाहूया किंवा निवांत भटकूया असं म्हटलं तर वेळ नाही म्हणून टाळून दिलंस तू नेहमी. तुझ्या कामांनाच आपलंसं करून घेतलंस तू. तसही तुझ्या कामाच्या वेळेत कधी आडकाठी केली नाही मी. जेव्हा वेळ मिळेल तेव्हा भेटत जा असं सांगायचे. दिवसातून एखादा तास बोलत जा किंवा आठवड्यातला सुट्टीचा एखादा दिवस तरी? दिवसागणिक मी पाठवलेले मेसेज तसेच अनरीड पडून राहायचे. हे मेसेज पाहायला तुझ्याजवळ एखादा मिनिटदेखील नसायचा? काही जगावेगळ्या अपेक्षा नसायच्या..? हे सगळं बोलून झाल्यावर मी समजून घेण्यात कमी पडते किंवा बावळट अपेक्षा आहेत या सगळ्या असं तुला वाटतं असेल तर वाटूदेत.
असो, आता खऱ्या अर्थाने कळलंय अपेक्षा हक्काच्या व्यक्तीजवळ करायच्या असतात आणि तेवढं कधी तू मला हक्काचं स्थान दिलेलं जाणवलं नाही. यावरून तू वाईट आहेस असं अजिबात नाही. तू तुझ्या बाबतीत योग्य आहेस आणि मी माझ्या बाबतीत योग्य. प्रत्येकाला स्वतःचं जीवन स्वयंपूर्ण आणि मनमोकळं जगायला आवडत असतं. अन् त्यास तू पात्र आहेस. आता मलाही माझं जीवन माझ्याप्रमाणे तुझ्याशिवाय जगायला आवडेल. आपण दोघांनी मिळून एकत्रित मनमोकळं जगावं अशी माझी इच्छा होती. हो...होती. कारण ही इच्छा 'तुझी' नव्हती (कदाचित).
Comments
Post a Comment