कागद - कथा - १
कागद - कथा
मध्यरात्री तिने पाहिलं तर विकास जागीच होता. टेबलवर पुढ्यात वही घेऊन लिहीत बसला होता. त्याच्या या सवयीची ओळख सुवर्णाला आता चांगलीच झाली होती. रात्री अपरात्री उठायचं, वहीवर काहीतरी लिहीत रहायचं. परंतु अजूनही तिला माहीत नव्हतं की, विकास नक्की काय लिहीत असतो. कितीतरी वेळा तिने याबद्दल विचारलं पण फक्त "काही नाही" यापलीकडे काही उत्तर नसायचं त्याच्याकडून आणि लिहून झालं की वही टेबल ड्रावरमध्ये लॉक करून ठेवत असे.
लग्नाला काही महिनेच झाले होते. अरेंज मॅरेज. सुरवातीला छंद, आवड-निवड या मोघम गप्पांमधून विकासाला लिखाणाची आवड आहे असं तिला कळलं. एका दिवशी पहिल्यांदा असं मध्यरात्री तिने लिहिताना पाहिलं तेव्हा याचं तिला काही विशेष वाटलं नाही. रात्रीच्या शांततेत त्याला लिहायला सोपं जात असावं अशी तिने समजूत घालून घेतली. पण आता हे दररोजचं झालं होतं; दिवसभर व्यवसाय बघायचा, घरी येण्याची वेळही त्याची ठरलेली नसायची परत असं जागरण. अश्याने तब्येतीची काय हाल होतील याचा त्याला काहीच विचार का नाही? अजूनतरी विकासाने लिहिलेलं काहीच तिला वाचायला दिलं नाही. 'तुझं लिखाण वाचायला दे पासून ते लिखाण कधी वाचायला देशील? हे तिचे प्रश्न बदलले पण त्याचं उत्तर "ठीक आहे बघतो" पलीकडे गेलंच नाही. अद्यापही त्याचं कुठल्याही प्रकारचं लिखाण तिला वाचायला मिळालं नाही; मग नंतर तिनेही याकडे दुर्लक्ष केलं.
एका रात्री विकास असाच जागी राहून लिहीत बसला. मात्र आज टेबलवर अन् खाली भोवताली कागदांच्या गोळ्यांचा पसारा जमा झालेला. विकास पानावर काहीतरी लिहायचा, पान भरून झालं की फाडून चुरगुळा करून फेकून द्यायचं. परत पानभर लिहून झालं की पान फाडून फेकून द्यायचं असं त्याचं सुरूच होतं. तिला काहीच उमजेना.
'विकास' तिने आवाज दिला. मात्र त्याच्या कामात गत्यंतर नव्हतंच. 'विकास काय झालं.' उठून त्याच्याजवळ गेली; खांद्यावर हात ठेवून अदबीने म्हणाली.
'काही नाही.' अगदी निर्विकारपणे उत्तर दिलं अन् त्याचं काम सुरूच ठेवलं. तिनेही हे पाहण्याशिवाय काहीच केलं नाही.
...पिढी स्तनाकडे आकर्षित होऊ लागली. माणसं जशी प्रगत होत गेली तसं आपल्याकडे जे नाही ते दुसऱ्याचं पाहण्याची उत्कंठा वाढत गेली. माणसांनीच स्तनांना लैंगिकतेकडे नेऊन ठेवलं. लेकरं जोवर दूध पितात तोवर स्तनांवर त्यांचा अधिकार मग नंतर...?
विकासचं लिहिणं सुरूच होतं. तो लिहित असताना तिची नजर लिहीत असलेल्या मजकुरावर होती. अचानक त्याने लिहिणं थांबवलं. पेनाने टेबलवर बारीक वर्तुळ काढून त्यावर गिरवत राहिला, नजर त्याची एकटक शाईने उमटलेल्या जाडसर वर्तुळात सामावली होती. शाई जशी वर्तुळात एकवटून जायची जसा त्याचा पेनवर जोर वाढत चालला होता अन् मध्येच पेनाचं टोक तुटून पडलं. मग झटकन एकाएकी त्याने परत वहीचं पान जोरात फाडून त्याचा चुरगुळा केला अन् जागीच फेकून दिले.
"विकास, काय झालंय अन् काय चाललंय तुझं हे? वेड्यासारखं अर्ध्या रात्री उठलास काय? वहीची पानं फाडून सगळा कचरा केलायस?"
"झोप तू." जसं विचित्र काही केलंच नाही असं त्याच्या बोलण्यातून जाणवत होतं.
"काय हे तुझं विचित्र वागणं मला काहीच कळत नाहीये. आणि काहीही काय लिहितोस हे. गेले कित्येक दिवस बघतेय तुला, रात्री जागरण करणार, दिवसभर काम तब्येतीची काय हाल होतील विकास? चल उठ इथून आणि आराम कर." सुवर्णाने त्याचा हात पकडत त्याला खुर्चीवरून उठवलं आणि त्याच्या मिठीत गेली.
क्रमशः
Interesting .... पुढचा भाग लवकर येऊ द्या
ReplyDeleteछान !
ReplyDeleteवाट बघतोय पुढील भागाची
Waiting for next part
ReplyDeleteपुढचा भाग कधी येतोय.
ReplyDelete